सोमेश्वरवाडीत चंद्रकांतदादा पाटील यांची सचिन दळवी यांच्याशी भेट; नाराजीनंतर भाजपाच्या प्रचारात पुन्हा सक्रिय

सोमेश्वरवाडीत : कोथरूड मतदारसंघाच्या उत्तर विभागाचे सरचिटणीस सचिन दळवी यांची कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमेश्वरवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चंद्रकांतदादांनी दळवी यांच्याशी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधत स्थानिक ग्रामस्थांशीही चर्चा केली.
सोमेश्वरवाडी परिसरातील काही प्रश्नांमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याने सचिन दळवी हे काही काळ प्रचारापासून दूर होते. ही बाब लक्षात घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत थेट सोमेश्वरवाडीत येऊन ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घेत योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

चंद्रकांतदादांनी ग्रामस्थांना संबोधित करत सांगितले की, सचिन दळवी यांना भविष्यात पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि संधी दिली जाईल. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सचिन दळवी यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत राहणार असल्याचे आश्वासन दिले. चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीनंतर त्यांनी पुन्हा भाजपाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून सोमेश्वरवाडी परिसरात नव्या उत्साहात प्रचाराला सुरुवात केली आहे.

या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कोथरूड मतदारसंघातील भाजपाचा प्रचार अधिक गतिमान होण्याची चिन्हे दिसत आहेत.

See also  पैलवान सागर तांगडे यांचे निधन