बाणेर : बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस आणि महाळुंगे परिसरात महिला सक्षमीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. या उपक्रमांचे नेतृत्व पुनम विशाल विधाते करत असून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक आणि स्वयंरोजगाराशी संबंधित अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत.
वामा वुमन्स क्लबच्या वतीने महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धांचे नियमित आयोजन करण्यात येते. तसेच सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी मंगळागौरीच्या स्पर्धा सातत्याने घेण्यात येतात. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आरीवरचे क्लासेस, शिवणकाम प्रशिक्षण, घरगुती मसाले तयार करण्याचे क्लासेस यांसारख्या उपक्रमांद्वारे महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यात आले आहे.याशिवाय गणपती मेकिंग कार्यशाळा, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान उपक्रम, कॅन्सर जनजागृती, योगा प्रशिक्षण आदी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून यशस्वीरीत्या राबवण्यात आले आहेत.
पुनम विशाल विधाते या गेल्या अनेक वर्षांपासून महिलांमध्ये सातत्याने कार्यरत असून प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्या प्रमोद निम्हण यांच्यासोबत इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महिलांचा सक्षम पाठिंबा, सोसायटी स्तरावर केलेले ठोस काम आणि सामाजिक कार्याचा अनुभव ही त्यांची प्रमुख जमेची बाजू मानली जात आहे. सध्या प्रचारादरम्यान त्यांना महिलांसह सर्वसामान्य नागरिकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून पुनम विधाते यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक ९ मध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे.

























