पुणे येथे १४ ते १६ एप्रिल दरम्यान वसुंधरा धान्य महोत्सव

पाषाण : वसुंधरा स्वच्छता अभियान, पुणे तर्फे १४ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत पाषाण-सूस रस्त्यावरील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे तीन दिवसीय नैसर्गिक शेती धान्याचा कार्यक्रम होणार आहे.

“वसुंधरा धान्य महोत्सव” या नावाने हा महोत्सव ओळखला जातो. शेतकर्‍यांना त्यांच्या भेसळविरहित अन्नधान्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच पुणेकरांना थेट शेतकर्‍यांकडून विषमुक्त उत्पादन विकत घेण्याची आणि त्याचा साठा करण्याची संधी देणे हे दुहेरी उद्दिष्ट आहे. धान्य महोत्सव हा वार्षिक कार्यक्रम असून त्याचे हे ७ वे वर्ष आहे. महोत्सवाद्वारे शाश्वत आणि विषमुक्त शेतीच्या “सुभाष पाळेकर कृषी” तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. मोठ्या संख्येने शेतकरी उत्सवाचा भाग बनू इच्छित असतात, पण किमान तीन वर्षांपासून या तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचीच निवड केली जाते.

यावर्षी महोत्सवात महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकऱ्यांचे सुमारे ३० स्टॉल्स असतील. या महोत्सवात धान्य, कडधान्ये, तसेच ज्वारी, ५ प्रकारचे गहू, १८ प्रकारचे मिलेट, डाळी, गूळ, द्राक्षे, हळद इत्यादी शेतमाल असेल. या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे खाद्याण्याचे स्टॉल्स ज्यामध्ये विविध स्वादिष्ट पदार्थ मिळतील. .

महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक व शेतकरी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते होणार आहे. शुभा कुलकर्णी, सागर कुलकर्णी (जीवित नदी चे समन्वयक), सरिता उत्कर्ष पदमन (लोकप्रिय यूट्यूबर आणि सरिताज किचनच्या होस्ट) आणि प्रदीप मसाने, सोनल मसाने (देशी पशुपालनाला प्रोत्साहन देणारे शेतकरी) या समारंभासाठी प्रमुख पाहुणे आहेत. सन्माननीय पाहुण्यांमध्ये श्री राहुल दादा कोकाटे (सामाजिक कार्यकर्ते), श्री सनी विनायक निम्हण (माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते), श्री बी.टी. निम्हण (सामाजिक कार्यकर्ते), श्री गुलाबराव अण्णा तापकीर (सामाजिक कार्यकर्ते), श्री भास्कर हरी साळी (निवृत्त बँक अधिकारी) समाविष्ट आहेत.

वसुंधरा स्वच्छता अभियान सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छीते की या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचं आरोग्य राखण्यास एक पाऊल घ्यावे तसेच शाश्वत नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मदत करावी. नैसर्गिक शेती जशी आपल्या आरोग्यासाठी खात्रीशीर विषमुक्त अन्न देते तशीच जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाचा सामना करण्याची ताकद या सुभाष पाळेकर कृषी पद्धतीत आहे. चला तर मग वर्षभराचे विषमुक्त धान्य थेट शेतकऱ्यांकडून घेऊ या, आपले व कुटूंबियांचे आरोग्य सुरक्षित करू या.

See also  लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन नितीन थोपटे व लिओ क्लबच्या अध्यक्षपदी लिओ वेदांत थोपटे यांची निवड.