औंध : औंध परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिस व वॉर्डनचे योग्य नियोजन व अतिक्रमण कारवाई या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच मोठ्या व्यावसायिक संकुलांनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम नकाशा प्रमाणे आपली आत व बाहेर वाहने नेण्याची व्यवस्था करावी असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
औंध येथील ट्राफिक व अतिक्रमण विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पोलीस महानिरीक्षक सीआयडी राजेंद्र डहाळे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त संदिप खलाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, नंदिनी वैग्यानी, पोलीस निरीक्षक मिनल पाटील, माजी नगरसेविका अर्चना मुसळे, मधुकर मुसळे, सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अभियंता वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी विविध सोसायटी यांच्या प्रतिनिधींनी आंबेडकर वसाहत ते मेडिपॉइंट हॉस्पिटल रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणे व अरुंद रस्ता यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर मेडिपॉइंट चौकामध्ये होत असलेली वाहतूक कोंडी याबाबत अनेकांनी तक्रारी सांगितल्या. रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
भाले चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या तसेच महादजी शिंदे रस्त्यावरील व्यावसायिक मॉल यांची आत व बाहेर जाण्याची व्यवस्था पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम प्लॅन प्रमाणे करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. औंध परिसरातील रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या व रस्त्यांमधील अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याची बाब यावेळी सर्व पुणे महानगरपालिका व वाहतूक पोलीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
यावेळी मधुकर मुसळे म्हणाले, औंध स्मार्ट सिटी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु मोठ्या फुटपाथवर अनधिकृत टपऱ्या व अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडी मध्ये भर पडताना दिसत आहेत. औंध परिसरातील नागरिकांनी सुचवलेल्या समस्या यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
यावेळी औंध डीपी रस्ता, नागरस रस्ता, तसेच मेडिपॉइंट परिसरातील विविध सोसायटी यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
























