प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्ते विकसित करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आश्वासन

बालेवाडी : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ सुस–बाणेर–पाषाण परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्ते विकसित करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे या परिसरांमध्ये सातत्याने भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत असलेले सर्विस रस्ते उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून लवकरात लवकर विकसित करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांनी दिली.

सर्विस रस्ते पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघातांची भीती तसेच दैनंदिन प्रवासातील असुविधांचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या वतीनेही राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रोड विकसित करण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे.

यासोबतच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा विकास करण्यात येणार असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुकर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

See also  नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त मेजर ध्यानचंद पुस्तकाने गाठला विक्रमी 20 हजार विक्रीचा पल्ला, लेखक संजय दुधाणे यांच्या  पुस्तकाची विक्रमी कामगिरी