जरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आमरण उपोषण, अंतरवाली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

जालना : मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनाला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. राज्य सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टिमेटमचा अवधि पूर्ण झाल्याने आजपासून बुधवार, (24 ऑक्टोबर) पुन्हा साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये केलेल्या लक्षणिक आमरण उपोषणानंतर राज्य सरकारने आरक्षणाबाबतीत तोडगा काढण्यासाठी वेळ मागितला होता. पण, दिलेल्या वेळेत राज्य सरकारने तोडगा न काढल्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळी, राजकीय नेत्यांना अंतरवाली सराटी गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जरांगे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टिमेटनंतरही मराठा आरक्षणप्रश्नी अद्याप तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, (23 ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन केले होते.

जरांगे पाटील म्हणाले, “आज २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार आहे. नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देण्याच्या आश्वासनावर जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली असेल तर ती चांगलीच बाब आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. जर तुम्ही ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. कारण ते कोर्टात टिकणार नाही,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

See also  राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे (PSP) अपारंपारीक ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस