बाणेर : रथसप्तमी या सूर्योपासनेच्या पवित्र मुहूर्तावर आज सकाळी ६.३० वाजता बाणेर येथील बाणेश्वर मंदिर परिसरात मुलांसाठी विशेष सूर्योपासना व योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात श्री. उल्हास चित्रे यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर करून मुलांना सूर्योपासनेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर उपस्थित मुलांकडून सूर्यनमस्काराची कृती करून घेण्यात आली.मानवी जीवनात प्राणायामाचे असलेले महत्त्व स्पष्ट करत कटके विद्यालयाच्या योग मार्गदर्शिका निलेखा तोटे मॅडम यांनी प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले व मुलांकडून त्याची कृती करून घेतली. तसेच योगाभ्यासात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शवासनाचे महत्त्व, प्रात्यक्षिक व कृती योग शिक्षिका जोशी मॅडम यांनी समजावून सांगितले.
हा कार्यक्रम श्रीभगवती सेवा आश्रम व जीवन कौशल्य विकास या संस्थेचे संकल्पक गिरीधर राठी, श्री बालाजी भजनी मंडळाचे जगदीशजी झंवर, मुरलीधरजी जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या उपक्रमात बाणेर, बालेवाडी व चाकणकर वस्ती विभागातील अनेक मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सूर्योपासना, योग व प्राणायामाच्या माध्यमातून मुलांमध्ये आरोग्यविषयक जाणीव निर्माण करण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी विशेष कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.























