पुणे शहरातील मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाला गती; संगमवाडी–बंडगार्डन टप्प्यातील ९० टक्के काम पूर्ण

पुणे : पुणे महानगरपालिका मार्फत मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे नियोजनबद्ध काम वेगाने सुरू असून, शहरातून वाहणाऱ्या एकूण ४४ किलोमीटर लांबीच्या नदीपैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या ३.७ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

यासोबतच बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान ५.५ किलोमीटर तसेच औंध ते बालेवाडी दरम्यान ८.१ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पालगत उपलब्ध जागेमध्ये नागरिकांसाठी विविध नागरी सुविधा व थीम पार्क उभारण्यात येणार आहेत.

सध्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या टप्प्यातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यातील संगमवाडी येथील अंदाजे १.५० किलोमीटर लांबीचा ट्रॅक सर्वार्थाने पूर्ण झाला आहे.आज दि. २६ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिका आयुक्त मा. नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत अतिरिक्त महापालिका आयुक्त मा. पृथ्वीराज बी. पी. (इस्टेट), मा. पवणीत कौर (जनरल), मा. ओमप्रकाश दिवटे (विशेष) तसेच शहर अभियंता मा. प्रशांत वाघमारे यांनी पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. यावेळी परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

पूर्ण झालेल्या १.५० किलोमीटर लांबीच्या ट्रॅकचे लोकार्पण पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार असून, हा ट्रॅक नागरिकांसाठी सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत वापरासाठी खुला ठेवण्याचे नियोजन आहे.तसेच मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यान सुमारे ५ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच उच्चपदस्थ मान्यवर मंत्री यांच्या हस्ते नजिकच्या काळात प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या नदीकाठ सुधारणा प्रकल्पामुळे पुणेकरांना चालणे, सायकलिंग, विरंगुळा व आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नैसर्गिक आणि सर्व सोयींनी युक्त वातावरण उपलब्ध होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

See also  व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीला ग्राह्य धरावी - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील