उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक असून मन सुन्न करणारे आहे. अजितदादा आपल्यातून गेले, ही गोष्ट अजूनही मनाला स्वीकारता येत नाही, अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाची जबाबदारी माझ्याकडे असताना विविध विकासकामांच्या निमित्ताने अजितदादांशी निकटचा संबंध आला. विविध विषयांवरील त्यांची मते अत्यंत सुस्पष्ट आणि परखड होती. विकासाची दूरदृष्टी, वक्तशीरपणा, ठोस निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासनावरील त्यांची घट्ट पकड वाखाणण्याजोगी होती, असे मोहोळ यांनी नमूद केले.कोरोना साथीच्या कठीण काळात पुणे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अजितदादांचे मोलाचे सहकार्य लाभले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी धैर्याने आणि ठामपणे नेतृत्व केले. त्या काळातील त्यांचे निर्णय पुणेकरांच्या कायम स्मरणात राहतील, असेही त्यांनी सांगितले.

अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राची अपूरणीय हानी झाली असून एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थनाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
भावपूर्ण श्रद्धांजली.

See also  स्वातंत्र्यदिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण