अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का — खासदार शरद पवार

पुणे : महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक घटना घडली असून, अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेले आणि निर्णय घेण्याची ताकद असलेले नेतृत्व आज राज्याने गमावले आहे. ही हानी भरून न निघणारी असल्याची भावना खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, “जे काही नुकसान झाले आहे ते भरून निघणारे नाही. मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात.”

दरम्यान, काही माध्यमांमध्ये या अपघातामागे राजकीय कारणे असल्याचे आरोप मांडले जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत स्पष्टीकरण देताना खासदार शरद पवार म्हणाले, “मी आज माध्यमांसमोर येणार नव्हतो. मात्र काही माध्यमांनी, विशेषतः कलकत्त्यावरून, या अपघातामागे राजकारण असल्याची भूमिका मांडली असल्याचे समजले. मात्र या घटनेत कोणतेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे.”

पुढे ते म्हणाले, “या मृत्यूच्या यातना केवळ कुटुंबापुरत्या मर्यादित नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहेत. कृपया या दुःखद घटनेला राजकीय रंग देऊ नये,” असे आवाहनही त्यांनी केले.

अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्राने आज एक सक्षम नेतृत्व गमावले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

See also  कोथरूड मध्ये "सफाई अपनाओ बिमारी भगाओ" व "स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन - २०२५" अन्वये विविध उपक्रम