पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्तृत्ववान नेतृत्व आदरणीय स्वर्गीय नामदार श्री. अजितदादा अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्याच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांमध्ये अजितदादा पवार यांचा सिंहाचा वाटा होता. कामाचा प्रचंड उरक, प्रशासनावर असलेला दरारा आणि वेळेचे काटेकोर नियोजन ही त्यांची ओळख होती. ‘शब्दाला पक्का नेता’ म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनतेची कामे मार्गी लावत असत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच राज्यातील विकासकामांना सातत्याने गती मिळत होती.
राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मैलाचे दगड ठरले आहेत. त्यापैकी पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला. याच निर्णयातून पुणे विद्यापीठ चौकात नव्याने दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून लवकरच तो पुणेकरांसाठी वाहतुकीस खुला होणार आहे.
पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करणाऱ्या या महत्त्वाच्या दुमजली उड्डाणपुलास “स्वर्गीय नामदार श्री. अजितदादा अनंतराव पवार उड्डाणपूल” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी दत्ता बहिरट यांनी PMRDA व पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या नामकरणामुळे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने अभिवादन होईल आणि पुणेकरांना त्यांच्या विकासदृष्टीची कायमची आठवण राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
























