पुण्यात ‘शहर परिवर्तन कक्ष’ स्थापन; सर्व विभागांमध्ये समन्वयातून विकासावर भर

पुणे :पुणे शहरात सुरू असलेल्या तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध शहरी उपक्रमांचा वाढता व्याप, नागरी सेवा व पर्यावरण व्यवस्थापनातील वाढती गुंतागुंत लक्षात घेता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र ‘शहर परिवर्तन कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आज शहर परिवर्तन कक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम होते.

बैठकीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, पुण्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुड्डी, तसेच पुणे महानगरपालिका, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, परिवहन, वन विभाग, वाहतूक पोलीस, दूरसंचार सेवा प्रदाते, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहर स्तरावर ‘शहर परिवर्तन कक्ष’ स्थापन करून प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. हे नोडल अधिकारी संबंधित प्रकरणांचे नियोजन, अंमलबजावणी व वेळेत निर्णय सुनिश्चित करतील.

भूसंपादनासंदर्भातील जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेऊन सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बंद असलेल्या कालव्यांचा सायकल ट्रॅकसाठी वापर करण्याबाबत जलसंपदा विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरातील फुटपाथवरील अडथळे, अस्ताव्यस्त विद्युत व दूरध्वनी केबल्स, बेकायदा फ्लेक्स व होर्डिंग, तसेच रस्त्यांवर अडथळा ठरणारी बेवारस वाहने त्वरित हटवण्याबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

आगामी काळात घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक व विकासात्मक निर्णयांसाठी सर्व विभागांनी आपले प्रस्ताव तयार ठेवावेत, तसेच पुढील एक वर्षात हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती वेळेत सादर करावी, जेणेकरून विभागांमध्ये योग्य समन्वय राखता येईल, असे निर्देश देण्यात आले.शहराचा शाश्वत, संतुलित व पर्यावरणपूरक विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

See also  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा...

शहर परिवर्तन कक्षाची बैठक दर महिन्याला एकदा घेण्यात येईल, अशी माहिती देत आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले.