मुळशी, प्रतिनिधी : मुठा खोऱ्यातील जातेड, कोंढुर, डावजे, कातवडी आणि बहुली या गावांना नेटवर्क सेवा पुरविणारा जिओचा मोबाईल टॉवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा टॉवर तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित कुडले, सरपंच तानाजी हालंदे, सरपंच रामचंद्र काळोखे, समीर शिंदे, आकाश भरेकर, रमेश पवार, राकेश कदम आणि नवनाथ हळनदे यांनी जिओचे विभागीय अधिकारी केळकर यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, रिंग रोडच्या कामामुळे संबंधित मोबाईल टॉवर हटविण्यात आल्याने तो तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून “आज सुरू होईल, उद्या सुरू होईल” अशी आश्वासने मिळत असली तरी प्रत्यक्षात सेवा अद्याप सुरू झालेली नाही.
टॉवर बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने फोन लागत नाहीत, इंटरनेट सेवा मिळत नाही, गॅस बुकिंगसह विविध ऑनलाइन कामे रखडली आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही कठीण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षण, अभ्यास साहित्य आणि इतर डिजिटल सुविधांचा लाभ घेण्यात अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवून नेटवर्क सेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, जिओचे पुणे विभागीय अधिकारी केळकर यांनी लवकरच सर्व्हे करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली.
स्थानिक ग्रामस्थांनीही जिओ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन टॉवरची सेवा तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
– पुणे बुलेटिन
















