पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित भव्य सामूहिक विवाह सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. या सोहळ्यात २० जोडपी विवाहबंधनात अडकली.
गंगाधाम रोड येथील गोयल गार्डन, आईमाता मंदिरासमोर सुमारे तीन एकर परिसरात भव्य मंडप उभारून हा सोहळा पार पडला. ज्येष्ठ समाजसेवक रतनलाल गोयल यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदू धर्मीय परंपरेनुसार सर्व विवाह विधी पार पडले. नवविवाहित जोडप्यांना सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, माजी नगरसेवक अभय छाजेड, प्रवीण चोरबोले, गीता गोयल यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
फाउंडेशनचे विश्वस्त राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, वाढत्या सामाजिक व आर्थिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली आहे. विवाह समारंभांवरील अवाजवी खर्चामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो. विशेषतः मुलीच्या विवाहाची चिंता पालकांसाठी मोठे ओझे ठरते. अशा वेळी सामूहिक विवाह सोहळे समाजात एकात्मता, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश देतात.
या सोहळ्यात विवाहबंधनात अडकलेल्या प्रत्येक जोडप्याला कपाट, पंखा, गादी, चादर, मिक्सर, देव्हारा तसेच भांडी-कुंडी संच असे गृहउपयोगी साहित्य भेटस्वरूप देण्यात आले. तसेच वधू-वरांना संपूर्ण वस्त्रसंच, मंगलसूत्र आणि आवश्यक वैवाहिक साहित्यही प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाचे यंदा १३वे वर्ष असून मागील १३ वर्षांत एकूण २६१ जोडप्यांचे विवाह या माध्यमातून लावण्यात आले आहेत. गोयल कुटुंबाच्या सामाजिक जाणिवेतून साकारलेला हा उपक्रम गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना सन्मानाने वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्याची संधी देणारा ठरत असल्याचे मत नवीन गोयल, वेदप्रकाश गुप्ता, विनोद जालान, विनोद अग्रवाल आणि आशीष गोयल यांनी व्यक्त केले.
























