पुणे : काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या जन्मदिनाचे अवचित्य साधून आज ९ डिसेंबर २०२५ रोजी काँग्रेस भवन येथे जिजाऊ सावित्रीच्या कर्तुत्ववान लेकींचा सन्मानपत्र देऊन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गौरव करण्यात आला.
सौ. विनया डोईफोडे या वाचन संस्कृती वाढावी यासाठी “विनया” फिरते वाचनालय माध्यमातून पुणे व परिसरात वाचन सेवा अविरतपणे देत आहेत.
सौ. अंजू माने हे नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रामाणिकपणाचा आदर्श म्हणून ओळखल्या जाते. पुणे मनपामधे सफाई कर्मचारी असणाऱ्या अंजू ताई यांनी कचऱ्यात सापडलेली १० लाखांची पिशवी संबंधित व्यक्तीला विनामोह परत केले.
श्रीमती. शांताबाई पवार, ८८ वर्षाच्या “योद्धा आज्जी”. या लाठी–काठीच्या कौशल्याने सर्वांच लक्ष वेधून घेत असतात. त्यांचे धाडस, सामर्थ्य व हृदयातील माणुसकी वाखाणण्यासारखे आहे.
सौ. प्रमिला लोखंडे या विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात समाज परिवर्तनाचे उल्लेखनीय कार्य करत आहेत.
सौ. शीला भोसले पुण्यातील वाहतुकीची जीवनवाहिनी पीएमटी सेवेतील महिला कंडक्टर पदी गेली १२ वर्ष कार्यरत आहेत. सामाजिक नियमांना आव्हान देणारे आणि
समानतेचे अडथळे मोडून काढणारे एक अभूतपूर्व कार्य करत आहेत. अशा या विविध क्षेत्रात आपले नाव लौकिक करणाऱ्या कर्तुत्ववान माता भगिनींचा सन्मान करताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये रोज या आपल्या भगिनी अनेक संघर्षमय प्रसंगांना समोर जात असतात. त्यातून आपली कर्तृत्वाची वेगळी वाट त्या निर्माण करत आहेत. काँग्रेस पक्ष कायम त्यांच्या सोबत आहे”.
यानंतर माजी आमदार दीप्ती चवधरी यांनी सर्व सन्मानार्थी महिलांचे कौतुक केले व त्यांचा आदर्श आपण सर्वांनी अंगिकारला पाहिजे असे प्रतिपादन केले. जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्वाचा वसा व वारसा पुणे शहरातील त्यांच्या या लेकी पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा सन्मान करण्याची संधी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्हाला मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा प्राची दुधाने यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले.
या वेळी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, प्रदेश प्रतिनिधी मेहबूब नदाफ, शहर सरचिटणीस राज अंबिके, सोशल मिडिया अध्यक्ष गुलाम हुसेन, अनिता धिमधिमे, प्रियांका मधाळे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा सावंत यांनी केले. तर आभार उषा राजगुरू यांनी मानले.
























