पहिल्याच पावसात पालिका व मेट्रोच्या नियोजनाचा फज्जा! बाणेरमध्ये रस्त्यावर तळे; नागरिक संतप्त

पहिल्याच पावसात मेट्रोच्या नियोजनाचा फज्जा! बाणेरमध्ये रस्त्यावर तळे; नागरिक संतप्त

पुणे, बाणेर : पहिल्याच जोरदार पावसाने बाणेरमधील सिंध सोसायटीसमोरील मुख्य रस्त्यावर मेट्रो प्रकल्पातील नियोजनातील त्रुटी उघड झाल्या. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मेट्रोच्या बांधकामानंतर या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. परिणामी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्याचे अक्षरशः तळ्यात रूपांतर झाले.

काही आठवड्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्पातील विविध समस्यांची पाहणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

“समस्या माहीत असूनही प्रशासनाने डोळेझाक केली. आता नागरिकांनी त्याची किंमत मोजायची का?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मेट्रो प्रशासनाच्या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था तातडीने उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

See also  नवीन पिढीचे नवं राष्ट्र भक्तीगीत म्हणून ‘विकसित भारतम्’ची नोंद होईल: शीतल पाटील