पुणे, प्रतिनिधी: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका कथित भोंदू व्यक्तीसोबतच्या फोटोवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र टीका केली आहे. उच्च तंत्र की उच्च तंत्र मंत्र! बोगस भविष्यवाणी इथेच शिकलात का दादा! अशी खोचक टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून बालवडकर यांनी केली.
बालवडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संबंधित व्यक्ती “भोंदू” असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कात राहणे हे सार्वजनिक जीवनातील जबाबदारीशी विसंगत आहे. तसेच, कोणत्याही दबावाला बळी न पडता संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुढे बोलताना, त्यांनी कोथरूडमधील नागरिकांच्या भावना व्यक्त करत, “सुसंस्कृत आणि सुशिक्षित मतदारांना या प्रकाराबद्दल चिंता वाटत आहे. अशा व्यक्तींसमोर मान झुकवणारा प्रतिनिधी कोथरूडचे नेतृत्व कसे करू शकतो?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाचा खुलासा जनतेसमोर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून, संबंधित फोटो आणि आरोपांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.या प्रकरणाकडे आता कोथरूडकरांसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
























