महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा महत्त्वाची ठरली -शरद पवार

नागपूर : युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा नागपुरात आयोजित केली होती तिथे उपस्थित तरुण आणि शेतकरी, सर्वसामान्य जनता यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद होईल अशी या ठिकाणी आयोजित केलेली युवा संघर्ष यात्रा, हजारोंच्या संख्येने त्याला शक्ती आणि प्रोत्साहन देणारे संघटनेचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो..!

एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम रोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला. ८०० किलोमीटरचा हा प्रवास, ३२ दिवसांचा हा कालावधी, १० जिल्हे, २० तालुके, ४०० गावं आणि रोजच्या रोज जवळपास २५ किलोमीटरचा हा प्रवास आणि २ लाखांपेक्षा अधिक सामान्य लोकांशी थेट संवाद अशा प्रकारचे काम यात्रेच्या माध्यमातून झाले.

दिग्विजय सिंह यांनी आता बोलत असताना सांगितले की, सबंध देशाचा इतिहास जर बघितला तर, दोन लोकांनी असा कार्यक्रम घेतला आणि राबवला; एक राष्ट्रनेता महात्मा गांधी आणि दोन चंद्रशेखर एकेकाळचे देशातले प्रधानमंत्री आणि या राजकीय नेत्यांसाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज हा यात्रेचा कार्यक्रम तरुणांनी आयोजित केला, कशासाठी केला ? तरुणांचे काही प्रश्न मांडले, मग ते पद भरतीचे असतील किंवा कंत्राटी कामगारांचे असतील तसेच रिक्त जागा भरण्यासंदर्भातले असतील असे अनेक प्रश्न आज तरुण पिढीच्या समोर आव आणून बसलेत आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची प्रेरणा आणण्यासाठी ही संघर्ष यात्रा इथपर्यंत आली. हे सगळं करत असताना महाराष्ट्र, तालुक्याचा जिल्ह्याचा, राज्याचा विकास आणि त्यासाठी गुंतवणूक याही गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे आणि या देशामध्ये काळ्या आईची इमान राखणारा हा जो शेतकरी आहे आणि त्याची शेती, आज त्यामधली संकटे यातून त्याचे सुटका करण्यासाठी अनेक कार्यक्रम हातामध्ये या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून घेतले.

शिक्षणाकडे लक्ष आहे, कायदा सुव्यवस्था याकडे लक्ष आहे, सामाजिक आणि क्रीडा या क्षेत्राकडे लक्ष आहे. अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाचा जो प्रश्न गंभीर झाला मग ते मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम समाजाला असलेले आरक्षण असेल या सर्वांच्या संबंधित नव्या पिढीला एक प्रकारचा आशावाद देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे आणि ती ते पार पाडत नसतील तर त्यांना जागं करणे आणि त्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे आणि म्हणून मी या सगळ्या तरुणांना मनापासून धन्यवाद देतो की, तुम्ही हा जो कार्यक्रम घेतलाय या कार्यक्रमातून जे चित्र तयार होणार आहे ते महाराष्ट्राला आणि देशाला योग्य रस्त्यामध्ये नेण्याबद्दलची काळजी करणार आहे, ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाळुंगे बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन व म्युझियमचे भूमिपूजन

मी एक वेळा यात्रा काढली होती, जळगावपासून नागपूरपर्यंत आणि मला आठवतंय की, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केली होती. अनेक लोक त्यामध्ये होते, हर्षवर्धन देशमुख या ठिकाणी आहेत तेही त्या ठिकाणी होते, पण त्यातले एक ऐतिहासिक काम काय झाले तर ते असे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रचंड कष्ट केले आणि महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केले ते यशवंतराव चव्हाण आणि मी स्वतः आणि अनेक सहकारी मला लाभले; मला आठवतंय आम्ही निघालो जळगाव वरून आणि यायचं होतं नागपूरला पण, अमरावती जिल्ह्यामध्ये चांदुर आणि पोरं या गावांदरम्यान चव्हाण साहेबांना आणि मला अटक केली अटक करून एसटीत बसवलं आणि आम्हाला भंडाऱ्याला नेऊन तिथल्या जेलमध्ये ठेवले, मी चव्हाण साहेबांना प्रश्न विचारला की, तुम्ही संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री होता तुम्ही एसटीत कधी बसलाय का ? त्यांनी सांगितलं की, राज्यात जेव्हा एसटीची स्थापना झाली, पहिल्या बसचे उद्घाटन झाले, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये मी एसटीत बसलो आणि त्यानंतर मला पोलिसांनी आता एसटीत बसवलेले आहे. सांगायचे तात्पर्य असे की, या यात्रा इतिहास घडवत असतात त्या वेळेची आम्ही काढलेली यात्रा ही कापसाला चांगली किंमत मिळावी, शेतीमालाच्या किंमतीसाठी होती आणि त्या वेळेचे राज्यकर्ते या गोष्टीकडे लक्ष देत नव्हते आणि म्हणून ही दिंडी काढली आणि त्या दिंडीचा परिणाम याच नागपूर शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने कष्टकरी लोक तेव्हा जमले आणि त्या सामुदायिक शक्तीच्या समोर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावे लागले आणि हे प्रश्न सोडवावे लागले

आज तरुणांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक इशारा त्यांनी दिलाय की, बाबांनो या मागण्या आम्ही केल्यात यात स्वतःचा सार्थ नाही, यात शेतकऱ्यांचे हित आहे, तरुणांचे भवितव्य आहे आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा आम्ही या ठिकाणी सामंजस्यपणे सहकार्य करायला तयार आहोत पण, सामंजस्य आणि सहकार्य या दोन्ही गोष्टी दाखवल्यानंतर जर तुम्ही या कामांकडे ढुंकून बघत नसाल तर ही युवाशक्ती जबरदस्त आहे आणि यासाठी काय करू शकते हा इतिहास या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही; हा कार्यक्रम या ठिकाणी त्यासाठीच घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या तरुणांचे मी अभिनंदन करू इच्छितो, मला माहिती आहे इतक्या दिवसाचा प्रवास; पाय कसे दुखतात, पायाला फोड कसे येतात या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्यात पण, आनंद हा आहे की, सहभागातून हे या सर्वांचे दुःख लपून गेले आणि जिद्दीने हा घेतलेला कार्यक्रम रोहितच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार, ही एक नवी दिशा तुम्ही दाखवली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी अभिनंदन करतो जो कार्यक्रम तुम्ही घेतलाय त्यात तुम्हाला साथ मिळाली नाही तर आमचे अनेक संसदेतले सहकारी या ठिकाणी आहेत, आम्ही देशाच्या पार्लमेंटमध्ये तुम्हा लोकांचे दुःख त्या ठिकाणी मांडू याची काळजी तातडीने घेऊन, एवढेच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो.

See also  मोदी - शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला : डॉ. कुमार सप्तर्षी ,मोदी लाट ओसरल्याने लोकसभा त्रिशंकु येईल

यावेळी आमदार रोहित पवार, रोहित पाटील आदी उपस्थित होते.