पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) जर ही जागा लढवली नाही, तर वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी बारामती विधानसभेच्या आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, जर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला नाही, तर काँग्रेस निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्याच भूमिकेला जिल्हा काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसविरुद्ध उमेदवार उभा केला होता, याकडे लक्ष वेधत जिल्हा कमिटीने ‘महाविकास आघाडीचा धर्म’ पाळून ही जागा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. बारामती विधानसभेची जागा लढवण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देविदास भन्साळी, कमलाकर सातव, गोविंद मिरघे, आकाश मोरे, रोहित बनकर, डॉ. विजय भिसे, राजेंद्र गायकवाड, धवल गाडे, रमेश जगदाळे यांच्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुकाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास बारामती विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही आमची तयारी आणि प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठवत आहोत असे श्रीरंग चव्हाण-पाटील (जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा काँग्रेस) यांनी सांगितले.






















