पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित “टेकविश्व २०२६” हा तांत्रिक उपक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कल्पनांना दिशा, भविष्याची निर्मिती या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, तांत्रिक कौशल्य आणि सर्वांगीण विकासाची प्रेरणा निर्माण केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अभय जेरे, एम.डी. व सीईओ डेक्सआयटी ग्लोबल तसेच माजी उपाध्यक्ष एआयसीटीई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवतंत्रज्ञान स्वीकारण्याचे आणि उद्योजकतेकडे वाटचाल करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करत उद्योजक वृत्ती विकसित करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयमालाजी कदम, अध्यक्षा शालेय शिक्षण समिती भारती विद्यापीठ उपस्थित होत्या. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मूल्याधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज स्पष्ट केली.
या प्रसंगी डॉ. के. डी. जाधव, सहकार्यवाह भारती विद्यापीठ, श्री. असीम सूरी, सिनर्जी नॅनो, नवी मुंबई आणि श्री. हरी प्रकाश पांडे, उप अभियांत्रिकी प्रमुख, इसार यूके सर्व्हिसेस हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उद्योगक्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कौशल्य यांचा मेळ घालण्याचे महत्त्व सांगितले.
याच प्रसंगी महाविद्यालयातील एकूण १३७ विद्यार्थ्यांना डॉ. पतंगरावजी कदम शिष्यवृत्ती या योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांना एकूण रुपये २३,३६,०७८ इतकी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या आर्थिक सहाय्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे. सदर धनादेश डॉ. के. डी. जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी प्रास्ताविकात अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी अशा व्यासपीठांची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाचे न्यूजलेटर प्रकाशित करण्यात आले. या न्यूजलेटरच्या संपादक म्हणून डॉ. दिपाली गोडसे यांनी कार्य केले.
उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे आणि उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. शारदा कोरे यांनी केले. डॉ. संदीप पाटील यांनी संयोजक म्हणून कार्य पाहिले, तर प्रा. महावीर कासार आणि प्रा. वर्षा करंबेळकर यांनी सहसमन्वयक म्हणून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
टेकविश्व २०२६ अंतर्गत विविध तांत्रिक स्पर्धा, ज्ञानवर्धक सत्रे आणि विद्यार्थी आधारित नवकल्पना सादर करण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यासाठी, तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी आणि भविष्यातील संधींचा शोध घेण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.
प्रेरणा लहासे, अदिती पवार आणि निवेदिता झा यांनी या कार्यक्रमाचे अतिशय सुरेख आणि प्रभावी सूत्रसंचालन केले.
























