भारतीययुगम ’२६ : परंपरा आणि तंत्रज्ञानाचा रंगतदार महोत्सव

पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित “भारतीययुगम ’२६ – द मल्टिव्हर्स एंटरटेनमेंट” हा सांस्कृतिक सोहळा यंदा उत्साह, सर्जनशीलता आणि तरुणाईच्या जोशाने अविस्मरणीय ठरला. “Roots to Routes (रूट्स टू रूट्स)” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम परंपरेच्या मुळांपासून आधुनिकतेच्या नव्या वाटांपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास साकार करणारा ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली आणि पुढील तब्बल पाच तास विविध सादरीकरणांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह दुमदुमून गेले. प्रत्येक कलाप्रकाराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत कार्यक्रमाला एक वेगळीच उंची दिली.

या प्रसंगी माननीय डॉ. एम. एस. सगरे, सहकार्यवाह, भारती विद्यापीठ, यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “तांत्रिक शिक्षण घेत असताना सांस्कृतिक जाणीव जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशी व्यासपीठे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्वाला व्यापक आकार देतात.” त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ ज्ञान नव्हे, तर सादरीकरणाची कला आणि आत्मविश्वास हीच खरी ओळख ठरते.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या भाषणात वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. ते म्हणाले, “महाविद्यालय हे केवळ शिक्षण देणारे ठिकाण नसून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे सक्षम व्यासपीठ आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले की, “स्वतःची क्षमता ओळखा आणि तिचा योग्य वापर करा, यश तुमच्यापासून दूर राहणार नाही.”

कार्यक्रमात “घबाड कुंड” या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमने विशेष उपस्थिती लावून वातावरण रंगतदार केले. या टीममध्ये निर्माता डॉ. रसिक कदम, दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील, अभिनेते सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता अंजुटे, बालकलाकार आरोही भोईर, लेखक संजय नवगिरे, खलनायकाची भूमिका साकारणारे प्रसाद सुर्वे, अभिनेते साहिल अन्नलदेवर तसेच व्यवस्थापक विष्णू घोरपडे यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाची नवी उंची निर्माण झाली.

मुख्य पाहुणे माननीय श्री. सचिन बोर्डे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “तांत्रिक कौशल्यांसोबतच मूल्ये, प्रामाणिकपणा आणि सतत शिकण्याची वृत्ती जोपासली, तरच खऱ्या अर्थाने यश मिळते.”

या यशस्वी आयोजनामागे संयोजक डॉ. एस. आर. पाटील यांचे नियोजनबद्ध नेतृत्व महत्त्वाचे ठरले. समन्वयक डॉ. एस. ए. इटकरकर तसेच सह-समन्वयक प्रा. पी. व्ही. मुळीक आणि प्रा. एस. व्ही. शेळके यांनी मोलाचे सहकार्य केले. उपप्राचार्या डॉ. एस. एस. चोरगे व उपप्राचार्य डॉ. ए. एम. पवार उपस्थित होते.

विद्यार्थी समन्वयक डिंपल इंगळे, श्रेया कांबळे, आर्या देशमुख आणि प्रियांका पाध्ये यांनी परिश्रमपूर्वक काम करत कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मयी खैरनार, वैष्णवी शर्मा, खुशी तेली, समृद्धी दातीर, ऋग्वेदा थोरात, वैष्णवी राऊत, डिंपल इंगळे, कशिश गोधवानी, सनिका पाटील, सानिका शिंगारे आणि प्रेरणा बगाडे या विद्यार्थिनींनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण, नेटक्या आणि आकर्षक शैलीत केले. त्यांच्या प्रभावी संवादकौशल्यामुळे आणि उत्साही सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक सुंदर लय मिळाली आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात त्या यशस्वी ठरल्या. भारतीययुगम ’२६ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता विद्यार्थिनींच्या कलागुणांचा, आत्मविश्वासाचा आणि सांस्कृतिक जाणीवेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. या भव्य सोहळ्याने प्रत्येकाच्या मनावर ठसा उमटवत पुढील वर्षांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला.

See also  गायकांना करिअरसाठी योग्य संधी आवश्यक - अनुराधा मराठे