93 वर्षांची प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची दिमाखदार वाटचाल; वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुणे : शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चा 93 वा वर्धापनदिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील योजनाही मांडण्यात आल्या.

सन 1934 मध्ये ‘अक्षय तृतीया’ या शुभमुहूर्तावर दिवंगत गुरुवर्य शंकररावजी कानिटकर आणि त्यांच्या पाच शिक्षक सहकाऱ्यांनी या संस्थेची स्थापना केली. “प्रोग्रेसिव्ह” आणि “मॉडर्न” या मूल्यांवर आधारलेली संस्था काळानुरूप बदल स्वीकारत आजही शिक्षणात नावीन्य टिकवून आहे. त्या काळी लावलेले छोटे रोपटे आज 93 वर्षांनंतर एका भक्कम वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.
सध्या संस्थेच्या अंतर्गत तब्बल 65 शाळा व महाविद्यालये कार्यरत असून सुमारे 65 हजार विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले जात आहे. कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात संस्थेचे विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संस्थेच्या 12 महाविद्यालयांपैकी 7 महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळाला असून उर्वरित महाविद्यालयांनाही लवकरच स्वायत्तता मिळवून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. सर्व महाविद्यालये NAAC मानांकित असून तांत्रिक संस्थांना NBA मानांकन प्राप्त आहे.

कार्यक्रमात बोलताना कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे यांनी सांगितले की, “शिक्षकांनी सुरू केलेली ही संस्था आजही शिक्षकच चालवत आहेत. त्यामुळे शिक्षणाचे व्यापारीकरण झालेले नाही. विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे हित जपत संस्थेने गुणवत्ता टिकवली आहे.” पुढील काळात मोशी येथे 22 कोटी रुपयांचा शैक्षणिक प्रकल्प उभारण्याची योजना असून इंजिनिअरिंग महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयासाठी 10 कोटी रुपयांची अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रयोगशाळेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विघ्नहारी महाराज देव, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी, मिलिंद एकबोटे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, बँक अधिकारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  पाषाण येथे गावचे पोलीस पाटील पंडितराव जाधव यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विघ्नहारी महाराज देव, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी, मिलिंद एकबोटे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, बँक अधिकारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या प्रगतीचा गौरव करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रात सातत्याने गुणवत्ता आणि आधुनिकता जपत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने उभारलेला हा आदर्श आगामी काळातही अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.