विकासकामांतील टक्केवारीप्रकरणी आम आदमी पार्टीचे पुण्यात आंदोलन

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप करत आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून भ्रष्टाचारमुक्तीसाठी पालिका भवनात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर टक्केवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
पुणे हे स्मार्ट सिटी व शिक्षणाचे केंद्र म्हणून देशभर ओळखले जात असताना, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जा ठेवून अधिकारी व लोकप्रतिनिधी संगनमताने काम करत असल्याचा आरोप करण्यात आला. ठेकेदारांकडून बिलं मंजूर करून घेण्यासाठी लाखो रुपयांची टक्केवारी द्यावी लागत असल्याचेही पक्षाने नमूद केले.

बाणेर परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या बिलावरून सत्ताधारी पक्षाच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये झालेल्या वादाने या प्रकरणाला अधिकच हवा मिळाली आहे. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत असून, यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेपेक्षा टक्केवारीलाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर आणि सुदर्शन जगदाळे यांनी पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन सादर केले.धनंजय बेनकर यांनी सांगितले की, समाजसुधारक Jyotirao Phule यांनीही पालिका कारभार भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लढा दिला होता. तसेच S. M. Joshi, Nanasaheb Gore यांसारख्या नेत्यांच्या निस्वार्थी कार्यामुळे पुण्याची ओळख उंचावली होती. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी या परंपरेचा विसर पडल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, सुदर्शन जगदाळे यांनी या कथित टक्केवारी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच Devendra Fadnavis यांनी आठ दिवसांत या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

पक्षाच्या वतीने “पुणेकरांच्या पैशांवर टक्केवारीचे राजकारण सहन केले जाणार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला असून, यासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनावेळी सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, मुकुंद किर्दत, सुभाष कारंडे, निरंजन अडागळे, सतीश यादव, निलेश वांजळे, आरती कारंजवाने, सुरेखा भोसले, सुनीता काळे, सुनील सौदी, थोरात कुमार धोंगडे, इब्राहिम शेख, कुणाल घारे, इकबाल तांबोळी, शेखर ढगे, सुरज सोनवणे, गणेश थरकुडे, उमेश बागडे, रुपेश, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, मिलिंद सरोदे, संतोष काळे, गजानन भोसले, डिकरा शेख, उमेश दीक्षित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  जालन्यातील घटनेची सखोल चौकशी सुरू आहे, मराठा आरक्षणासाठी शक्य तितके प्रयत्न करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे