पुणे, दि. १० : आधुनिक काळात अनेक क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर आहे. मात्र, त्यासाठी नवकल्पनांसाठी सातत्याने व्यासपीठे उपलब्ध झाली पाहिजेत. या व्यासपीठांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ज्यामुळे समाजाच्या तळागाळापासूनच्या नवकल्पना पुढे येऊ शकतील. पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५ हा उपक्रम अशा सर्वसमावेशक नवकल्पनांना पुढे नेणारा असल्याने तो महत्त्वाचा आणि औचित्याचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करीत असताना उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आज कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. शेलार बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांचे सहकार्य या प्रदर्शनाला लाभले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, अधिष्ठाता प्रा. डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एक्स्पोच्या आयोजक अमृता देवगांवकर व मंदार देवगांवकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी सर्वोत्तम २४ स्टार्टअप्सना ॲड. आशिष शेलार तसेच डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रदर्शनातील सहभागींना गुंतवणूकदारांशी स्टार्टअपसंबंधी थेट चर्चा व सादरीकरणाची संधीही मिळाली.
ॲड. आशिष शेलार म्हणाले, “देशाच्या प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेने समान संधी आणि समान संरक्षणाची हमी प्रदान केली आहे. त्याला अनुसरुन शहरी तसेच ग्रामीण भागांतील नवकल्पनांना व्यासपीठ देणारा पुणे स्टार्टअप एक्स्पो हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समान संधी आणि संरक्षण, प्रत्येकाला द्यायचे असेल, तर नवकल्पनांचेही विकेंद्रीकरण झाले पाहिजे. नागरी तसेच ग्रामीण भागांतील युवांच्या नवकल्पनांना व्यासपीठ आणि गुंतवणूकदार मिळायला हवेत. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून तळागाळातील नवकल्पनांना पाठिंबा मिळेल, व्यापक अवकाश मिळेल, नवकल्पनांची वास्तवातील व्यावहारिकता पुढे येईल आणि अंतिमतः विकसित, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचे योगदान राहील.” पुण्यासारख्या विकसित, शैक्षणिक, उद्योजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या पुढारलेल्या शहरांत या प्रदर्शनाचे आयोजन अधिक औचित्यपूर्ण आहे, असेही ॲड. शेलार यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील यांनी स्टार्टअपची संकल्पना कोविड संकटकाळात खऱ्या अर्थाने पुढे आली, याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे कार्पोरेट क्षेत्र आणि वर्क फ्रॉम होम, यांच्यामधील दुवा म्हणून डेस्टिनेशन को वर्किंग काम करत असल्याचे सांगितले. डेस्टिनेशन को वर्किंगमध्ये कार्यरत सुमारे दीडशे व्यावसायिकांच्या वैचारिक आदानप्रदानातूनच स्टार्टअप एक्स्पोची संकल्पना पुढे आली आणि आज ती प्रत्यक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, सामान्य नागरिक आज आपल्या नोकरीपलीकडे फारसा विचार करताना दिसत नसल्याने २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर देशाला श्रीमंत बनवायचे असेल तर देशातील नागरिक श्रीमंत व्हायला हवेत हे नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले. हे ध्येय साकारताना इनोव्हेशन्स अर्थात नवकल्पना यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलू शकत असल्याने त्यांना अनुरुप असे नवे शैक्षणिक धोरण, उद्योग क्षेत्राशी संलग्न प्रात्यक्षिक शिक्षण पद्धती त्यांनी आणली. यामध्ये मातृभाषेतील शिक्षणाचा प्राधान्यक्रमही वाढविला. या सर्वांमुळे आज २०२५ साली स्टार्ट अप आणि संशोधक या दोघांनाही चालना मिळत आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर मागील काही वर्षात भारतातील महिला स्टार्ट अप्स हे जगात पहिल्या क्रमांकावर असून पुरुषांनी बनविलेले स्टार्ट अप्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, बचतीचे महत्त्व आणि उद्योजकीय मानसिकता घडवण्याचे कार्य होत आहे.”
डॉ. राहुल कराड यांनी एमआयटी सदैव नव्या शैक्षणिक संकल्पना उचलून धरत असल्याचे सांगितले. स्टार्टअप एक्स्पोला पाठिंबा देणे आणि सर्वतोपरी साह्य करणे, हे त्याचाच एक भाग आहे. एमआयटी नेहमीच विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, ऊर्जा हे व्यक्त होण्यासाठी पूरक असे उपक्रम आयोजित करते. भारतीय छात्र संसद हा उपक्रम यापैकीच एक असल्याचे कराड यांनी नमूद केले.
अमृता देवगांवकर म्हणाल्या, “या उपक्रमामुळे राज्याच्या विविध भागातील नवोदितांच्या स्टार्टअप्सना एक व्यासपीठ तर विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे. या एक्स्पोच्या निमित्ताने काही स्टार्टअप्स उद्योजकांना आपल्या नवकल्पना सादर करण्याची, बाजारात आपली ओळख वाढवण्याची व आपल्या स्टार्टअपला गती देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देखील मिळेल.” मंदार देवगावकर, अमित आंद्रे यांनीही मनोगत मांडले. डॉ. गार्गी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.