पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरूड येथील आपल्या निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बजावले.बैठकीदरम्यान बाणेर-बालेवाडी भागातील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या भागात सुरू असलेले रस्ता रुंदीकरण तसेच मेट्रो प्रकल्पाची कामे यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, जोडणीच्या ठिकाणी केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून; त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
बैठकीदरम्यान बाणेर-बालेवाडी भागातील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या भागात सुरू असलेले रस्ता रुंदीकरण तसेच मेट्रो प्रकल्पाची कामे यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, जोडणीच्या ठिकाणी केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून; त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
याशिवाय, बाणेर-बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभे राहत असल्याने विद्युत भारात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत विद्यमान वीज यंत्रणा अपुरी पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी ना. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस आदी भागातील वीज वितरण यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय या भागासाठी नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, त्याबाबत महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी NCL अतिउच्चदाब केंद्रातून दोन नवीन फीडर सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येत्या सहा महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना ना. पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
वरील कामांमध्ये कोणत्याही स्तरावर अडथळे निर्माण झाल्यास मंत्रालय स्तरावर अथवा महावितरण मुख्यालय स्तरावर स्वतंत्र बैठका घेऊन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. विशेषतः अत्यावश्यक वीज दुरुस्तीच्या कामांसाठी रस्ते खोदाई परवानग्यांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पुणे महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सदर प्रश्न सोडविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना आश्वास्त केले.
तसेच, बाणेर-बालेवाडी परिसरातील वीजपुरवठ्याचा नियमित आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. नागरिकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला नगरसेविका मयूरी कोकाटे, महावितरणचे गणेशखिंड मंडळाचे अधिक्षक अभियंता सिंहजीराव गायकवाड, शिवाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, पंडित दांडगे, उमेश उर्पे, भाजप कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर,उमाताई गाडगीळ, अनिकेत चांदेरे,निकीता माथाडे तसेच BBPRA (बाणेर, बालेवाडी, पाषाण रेसिडेंस असोसिएशन)चे अध्यक्ष विजय वरणगावकर, सारंगजी वाबळे, संजयजी वाघूलदे, अमेय जगताप, सारंग रानडे यांच्यासह बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.














