पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात पुण्यात आपचा बैलगाडी मोर्चा

पुणे : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात तसेच महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्यात अभिनव बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी “पेट्रोलचे भाव कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ”, “डिझेलचे भाव कधी कमी होणार?”, “गॅसचे भाव कधी कमी होणार?” तसेच “महागाई कधी कमी होणार?” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या घोषणांना नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करत, “सामान्य नागरिकांवर त्यागाची जबाबदारी टाकली जात असताना सत्ताधारी केवळ दिखावूपुरता साधेपणा स्वीकारत आहेत,” असा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला.

यावेळी सरकारी खर्चावरील उधळपट्टी रोखण्यासाठी आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिकेसमोर सात “प्रति-आवाहने” मांडली. यात शासकीय सोहळ्यांवरील खर्च कमी करणे, साधेपणाचा अवलंब, लोकप्रतिनिधींनी वेतन-भत्त्यांचा त्याग करणे, भव्य रॅली आणि विदेशी दौरे बंद करणे, व्हीआयपी संस्कृती कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची अंमलबजावणी करणे अशा मागण्यांचा समावेश होता.

मोर्चामध्ये विजय कुंभार, डॉ. अभिजीत मोरे, अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे, संजय कोने, सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, सुभाष कारंडे, सतीश यादव, ऋषिकेश कनवटे, अॅड. गणेश थरकुडे, विकी पासोटे, शुभम चव्हाण, ऋषिकेश मारणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

See also  महामेट्रोला मनपा नोटीसा देऊन थकली पण कारवाई का नाही?: मेट्रोच्या मनमर्जी विरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन