पुण्यातील पाणी टंचाईला भाजपच जबाबदार आम आदमी पार्टीचा आरोप

पुणे : खडकवासला धरण साखळीतील कालवे गेले तीन महिने भरभरून वहात राहिले, तरी सत्ताधारी बेफिकीर राहिले, ही बेफिकीरीच पुण्यातील पाणी टंचाईला कारणीभूत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

पुण्याला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांत डेड स्टॉक सहित केवळ ५.५ टी एम सी पाणी शिल्लक असल्यामुळे पुणे महापालिका ‘एक आड एक दिवस पाणीपुरवठा’ करण्यावर विचार करत आहे, अशा बातम्या आल्या आहेत. पुणेकरांचा घसा आता पाण्याअभावी कोरडा होणार आहे. २४ × ७ पाणीपुरवठ्याची भाजपची घोषणा हवेत विरून गेली असून आता पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.  याला कारण आहे पाण्याचे बेजबाबदार व्यवस्थापन आणि पुण्यातील आमदार, कालवा समिती सदस्यांची बेफिकीरी कारणीभूत आहे, असे आम आदमीच्या पत्रकात म्हटले आहे.

आम आदमी पार्टीचे डॉ.अभिजीत मोरे, अमित म्हस्के, संजय कोने, अक्षय शिंदे यांनी केलेल्या पाहणीमध्ये आढळलेली गंभीर बाब म्हणजे, खडकवासला धरणातील उजव्या कालव्यातून जून महिना आला तरी पाणी वाहत आहे. सर्व सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून दोन ते अडीच महिने झाले तरीही हा कालवा भरून वाहतो आहे. गेले तीन महिने सलग हा कालवा भरुन पाणी वाहत आहे. हा पाण्याचा गुन्हेगारी अपव्यय आहे. यासाठी सत्ताधारी आमदार व कालवा समिती सदस्यच थेट जबाबदार आहेत. पुण्याचे आमदार व कालवा समितीचे सदस्य ‘डुलक्या’ घेत आहेत. आमदार व कालवा समितीची पाणी वाटपातील ही गुन्हेगारी उदासीनता लोकांवर अन्याय करणारी आहे. 

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राथमिकता दिली जावी. त्यानंतर शेती आणि त्यानंतर उद्योग हा प्राधान्य त्याचा क्रम काटेकोरपणे पाळला जावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. पुणे शहराची प्रचंड वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार पुणे शहराला प्राधान्यतेचा  पाणीपुरवठ्याचा साठा उपलब्ध करून दिला जावा. खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्यातील पाणीप्रवाह तात्काळ बंद करावा. पाण्याच्या आवर्तनाचा आढावा घेऊन पुनर्नियोजन करावे. कार वॉशिंग सेंटर, वॉटर पार्क यांसारख्या पाणी वाया घालवणाऱ्या व्यावसायिक उपक्रमांवर बंदी आणावी, अशाही मागण्या आम आदमी पार्टीने केल्या आहेत.

See also  महाबळेश्वर येथे विभागीय नाट्यसंमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन