पुणे : पुणे शहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या लक्षात घेता आगामी काळात पुणे शहराला परिपूर्ण बनवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरात मेट्रो, दोन रिंग रोड, हायवे, विमानतळ, त्याचबरोबर वाहतुकीचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. शहरातील वाहन आणि रस्ते यांच्या व्यस्त प्रमाणामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आगामी काळात शहराला परिपूर्ण बनवण्यासाठी संपूर्ण वाहतुकीची जबाबदारी सक्षम आय.ए.एस किंवा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत पार पाडली जावी.
याप्रमाणेच तसेच पुण्यात खून, हाणामारी, सायबर गुन्हे अशा घटना वाढीस लागत आहेत. यामुळे पुण्याची सांस्कृतिक शहर ही ओळख पुसली जाऊन गुन्हेगारीचे शहर ही ओळख निर्माण होते की काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात व्हीआयपी मुव्हमेंट, त्यांचा बंदोबस्त, एस्कॉर्टिंग याचा पुणे पोलिसांवर मोठा ताण असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करून बंदोबस्त आणि या गोष्टींसाठी नेहमीच्या पोलीस दलाचा वापर न करता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची पुणे शहराला गरज आहे. त्यातून शहराच्या कायदा सुव्यवस्थेमुळे पोलीस दलाचे गुन्हेगारी कमी करण्यात आणि कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.
याबरोबरच कोव्हीड सारख्या एखाद्या जागतिक महाभयंकर आजाराला तोंड देण्यासाठी आजही आपल्याकडे अस्तित्वात असलेला साथरोग नियंत्रित कायदा इंग्रजकालीन आहे. त्यामुळे पुणे शहराची व्याप्ती लक्षात घेता आता संपूर्ण शहराला एकत्र आरोग्यप्रमुख नेमण्याची तसेच शहराचे आरोग्य विषयक सर्व अधिकार त्यांच्याकडे देण्याची आवश्यकता आहे. वैद्यकीय माहितीच्या अनुसार या क्षेत्रातील काम डॉक्टर असलेल्या अधिकाऱ्यास आरोग्य प्रमुख करणे योग्य ठरेल याबाबत आपण सकारात्मक विचार करावा अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे पालकमंत्र्यांकडे केली आहे.
घर ताज्या बातम्या पुण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा सुनील माने यांची पालकमंत्र्यांकडे मागणी