नागरिकांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर झाला असून नागरिकांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. दिवसे बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजू नंदकर उपस्थित होते.

श्री. दिवसे म्हणाले, पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार असून मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी २० ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये मयत मतदारांचे नाव वगळणे, नवीन मतदारांचे नाव नोंदणी करणे यासारखे कार्यक्रम राबविले जातील. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या सहकार्याने मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यात येईल. यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका स्तरावरील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येईल. गृहनिमार्ण संस्थेतील मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी एक हजारपेक्षा अधिक मतदार असलेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास प्रत्येक केंद्रावर मतदारांची संख्या साधारण समान राहील असे प्रयत्न करण्यात येतील.

तात्पुरते मतदान केंद्र कायमस्वरुपी जागेत स्थलांतरीत करणे, मतदारांचे नाव जवळच्या मतदान केंद्राच्या यादीत असेल याची दक्षता घेणे, मतदार यादीतील तपशीलात आवश्यक दुरुस्त्या करणे, मतदार यादी संदर्भात राजकीय पक्षांच्या चांगल्या सूचनांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे आदी बाबी या मोहिमेदरम्यान करण्यात येतील.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत नाव नोंदणी करणे, मयत मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीतील नावासमोरील तपशीलात बदल यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. आतापर्यंत १ लाख ६० हजार अर्ज प्रलंबित असून त्यावर येत्या काही दिवसात निर्णय घेण्यात येईल. नागरिकांनी मतदार यादीत ऑनलाईन नावनोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्जाची प्रत मतदार नोंदणी अधिकारी किंवा तहसील कार्यालयात सादर करता येईल.

आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्याच्यादृष्टिने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी याचे एकत्रित प्रशिक्षण घेण्यात येईल. छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
0000

See also  स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती संवेदना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस