पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तसेच या मार्गावरील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक महिन्याच्या आत दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या मार्गावर पादचारी क्रॉसिंग, आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक सिग्नल उभारणे आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या तातडीच्या उपाययोजना आठ दिवसांच्या आत पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलामार्गे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राजाराम पूल ते म्हात्रे पूल या डीपी रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून महापालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली.
वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी नागरिकांच्या सूचना आणि अधिकाऱ्यांसोबत केलेल्या पाहणीचा अहवाल सादर केला. त्यानंतर नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी जमीन अधिग्रहणासंदर्भात जागामालकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच राजाराम पूल परिसरातील वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांतदादा पाटील यांनी या कामाचा दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटविणे, तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरासह इतर कोंडीच्या ठिकाणी वाहतूक विभागाने कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून ३० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून दिल्याची माहिती देत, आवश्यकता भासल्यास आणखी २५० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक पुनीत जोशी, पृथ्वीराज सुतार, ॲड. मिताली सावळेकर, राजाभाऊ बराटे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस सुशील मेंगडे, महापालिका व वाहतूक विभागाचे अधिकारी, भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी परिसरातील नागरिकांच्या प्रमुख वाहतूक समस्यांवर प्रकाश टाकला.













