बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार कामगार नेते सुनील शिंदे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या बोनस समुग्रह अनुदान व इतर प्रश्नांच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. आज सकाळी महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पांजली अर्पण करून सुनील शिंदे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले.

दिवसभर या आंदोलनाला महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षारक्षक, पाणीपुरवठा, कीटकनाशक, हॉस्पिटल, स्मशानभूमीतील कंत्राटी कामगार, कंत्राटी चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला. सकाळपासून सुमारे 300 कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी कामगार एकजुटीची गाणी, तसेच बोनस आमच्या हक्काचा, आमचाच लढा न्यायासाठी अशा घोषणाही देण्यात आल्या.

दिवसभरामध्ये प्रशासनाकडून मात्र या आंदोलनाची कोणती दखल घेण्यात आली नाही. कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनी द्वारे सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला व प्रश्न समजावून घेतले या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाकडून कामगार अधिकारी व इन्स्पेक्टर पाठवून प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर कामगारांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. आज या ठिकाणी कोणताही निर्णय न झाल्याने कामगार नेते सुनील शिंदे यांनी जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलन चालू आहे असे सांगितले. या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, एस के पळसे, त्याचबरोबर संघटनेचे विविध कामगार प्रतिनिधी उपस्थित होते

See also  छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील खेळणी दुरुस्त शिवसेनेने दिले अनोख्या स्टाईलने पत्र