पुणे महानगरपालिका भरती घोटाळा प्रकरण: ‘आम आदमी पार्टी’ रविराज काळे पाठपुराव्याला यश; अखेर मुख्य संशयितांवर गुन्हा दाखल!

पुणे: पुणे महानगरपालिकेतील बहुचर्चित आणि कथित भरती घोटाळा प्रकरणी अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृतपणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आम आदमी पार्टी (AAP) आणि पक्षाचे पुणे शहर नेते रविराज काळे यांनी या संपूर्ण गैरव्यवहाराविरोधात प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे केलेल्या अत्यंत आक्रमक आणि कायदेशीर पाठपुराव्यामुळेच ही मोठी कारवाई झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत होते. याविरोधात आम आदमी पार्टीने पुराव्यांसह प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करणे भाग पडले आहे.

गुन्ह्याचा आणि एफआयआरचा (FIR) सविस्तर तपशील:
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या प्रथम खबरी अहवाल (FIR) क्रमांक ०१८५/२०२६ नुसार, हा घोटाळा १८ मार्च २०२२ ते १७ जुलै २०२६ या दीर्घ कालावधीत घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या खालील गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे:
कलम ३१६(२), ३१६(५): फसवणूक आणि विश्वासघात
कलम ३१८(४): फसवणूक (Cheating)
कलम ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२) आणि ३(५)
या मुख्य संशयितांवर गुन्हा दाखल:
एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार खालील तीन प्रमुख व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. शिवानंद बाळासाहेब पाटील (पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर)
२. नमिता गोवर्धन बनसोडे (शिवाजीनगर, पुणे)
३. राजेंद्र बबन खेडेकर (शिवाजीनगर, पुणे)

या कारवाईवर बोलताना आम आदमी पार्टीचे नेते रविराज काळे म्हणाले, “पुणे महानगरपालिकेतील हा भरती घोटाळा म्हणजे महाराष्ट्रातील लाखो प्रामाणिक आणि बेरोजगार तरुण-तरुणींच्या भविष्याशी आणि हक्काशी केलेला क्रूर खेळ होता. आम आदमी पार्टीने पहिल्या दिवसापासून या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. प्रशासनाकडून हा गुन्हा दाबण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु आम्ही पुराव्यानिशी आमचा पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर या लढ्याला यश आले असून गुन्हा दाखल झाला आहे. हा केवळ पहिला टप्पा आहे; या घोटाळ्याचे धागेदोरे कोणाकोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा सखोल तपास करून सर्व मुख्य सूत्रधारांना गजाआड करेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”

See also  जबाबदारीची दोस्ती! ना पार्टी, ना ट्रेक; पुण्यातील तरुणांनी थेट पोलिसांसोबत साजरा केला अनोखा 'Friendship Day'

आम आदमी पार्टीने पुणे पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाचा तपास तात्काळ एका विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पालिकेतील मोठ्या अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे लागेबांधे समोर येऊ शकतील.