सुस : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील सुस गावात कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांचा दोन दिवसांचा गाव भेट दौरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दौऱ्याची सुरुवात सुस येथील काळ भैरवनाथ मंदिराच्या दर्शनाने करण्यात आली.
गाव भेट दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिक, ज्येष्ठ मंडळी, व्यापारी बांधव, सहकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. दोन्ही दिवस सुस गावात नागरिकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली असून, स्थानिक व्यापारी वर्गानेही या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दौऱ्याच्या काळात बालवडकर यांनी घराघरांत जाऊन नागरिकांची विचारपूस केली. नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा, दैनंदिन प्रश्न आणि तातडीने सोडवावयाच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पायाभूत सुविधा, स्थानिक व्यवसायांचे प्रश्न तसेच रोजगाराच्या संधी यासारख्या विषयांवर नागरिक व व्यापाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत परिसरातील तरुणांशी शिक्षण, कौशल्यविकास, रोजगाराभिमुख उपक्रम आणि पुढील पिढीसाठी आवश्यक विकासात्मक संधी यावर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
या वेळी बोलताना बालवडकर म्हणाले की, “प्रभाग क्रमांक ९ चा सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांशी असलेले हे नाते केवळ राजकीय नसून सामाजिक आणि विश्वासाच्या बंधावर आधारित आहे. सुस गावातील नागरिक, व्यापारी आणि तरुणांनी दाखविलेल्या प्रतिसादामुळे पुढील कार्यासाठी अधिक ऊर्जा आणि निर्धार मिळाला आहे.”
हा गाव भेट दौरा पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, प्रत्येक वस्ती, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचून त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. या दोन दिवसांच्या दौऱ्यात स्थानिक कुटुंबप्रमुख, व्यापारी, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल बालवडकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
























