पुणे, प्रतिनिधी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने आणि सखी-सुखदा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित नवजात व लहान बालकांसाठीच्या मोफत श्रवण तपासणी व तज्ज्ञ मार्गदर्शन शिबिराला कोथरुडमधील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे १०० बालकांची श्रवण तपासणी करण्यात आली.
नवजात बाळांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात अनेक मातांनी आपल्या बाळाच्या श्रवणक्षमतेचा अहवाल पाहिल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला. काही मातांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले, तर अनेकांच्या ओठांवर एकच भावना उमटली – “आई… खरंच माझं बाळ ऐकतंय!”
अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे प्रसूतीनंतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या वेळेत करता येत नाहीत. अशा परिस्थितीत कोणत्याही बालकाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये आणि प्रत्येक पालकाला आपल्या बाळाच्या श्रवणक्षमतेची खात्री मिळावी, या उद्देशाने हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी डॉ. संवाद स्पीच-हिअरिंग क्लिनिक अँड रिसर्च फाउंडेशनच्या संचालिका शिल्पा हुजूरबाजार, प्राजक्ता हुजूरबाजार आणि यश हुजूरबाजार यांनी पालकांना मार्गदर्शन केले. “श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास उपचार आणि पुनर्वसन लवकर सुरू करता येते. त्यामुळे मुलांच्या बोलण्याच्या, भाषिक आणि बौद्धिक विकासाला योग्य दिशा मिळते. वेळेत केलेली श्रवण तपासणी अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकते,” असे त्यांनी सांगितले.
शिबिरामुळे अनेक पालकांच्या मनातील भीती दूर झाली, तर काही बालकांना पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन मिळाले. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थित पालकांनी ना. चंद्रकांतदादा पाटील आणि सखी-सुखदा फाउंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील यांचे आभार मानले.
“राजकारणापलीकडे जाऊन नवजात बालकांच्या निरोगी भविष्यासाठी राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजात विश्वास निर्माण करणारे आहेत,” अशा भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केल्या.
















