विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती

पुणे : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, गणना पत्रांची छाननी, माहितीची पडताळणी, डिजिटल नोंदणी, दस्तऐवज तपासणी तसेच २००२ च्या मतदार यादीतील नावे शोधून मतदार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सहकार्य करण्याचे महत्त्वपूर्ण काम विद्यार्थी करत आहेत.

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी निवडणूक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारीने कार्यरत आहेत. प्राप्त झालेल्या गणना पत्रांवरील माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, माहिती संगणकीय प्रणालीत नोंदविणे, अर्जांचे वर्गीकरण करणे यासोबतच २००२ च्या मतदार यादीतील संबंधित मतदारांची नावे शोधून त्याची पडताळणी करण्यात मतदार व बीएलओंना मदत केली जात आहे. त्यामुळे मतदार नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि अचूक होत आहे.

युवकांच्या सहभागामुळे मोहिमेतील कामकाज अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने होत असून, निवडणूक यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अत्यंत जबाबदारीने आपली भूमिका बजावत असून, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी प्रक्रियेलाही गती देत आहेत.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक व्यवस्थेबाबत जागरूकता वाढत आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व, अचूक मतदार यादीची आवश्यकता आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका यांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत आहे. त्याचबरोबर मतदारांशी संवाद साधताना त्यांच्यात नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीवही अधिक दृढ होत आहे.

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, बीएलओ आणि स्वयंसेवी विद्यार्थ्यांचा समन्वय महत्त्वाचा ठरत असून, त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोहिमेला अधिक गती मिळत आहे. विशेषतः २००२ च्या मतदार यादीतील नावे शोधून देण्याच्या विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे मतदार पडताळणी प्रक्रिया अधिक परिणामकारक आणि सुलभ ठरत असल्याचे निवडणूक प्रशासनाने नमूद केले आहे.

See also  आचार्य श्री नित्यानंदसुरीश्वरजी म. सा. यांना राष्ट्रसंत पदवी प्रदान