भाजपाच्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेवर १,६०० कोटींचा खर्च करूनही ३२ टक्के पाणीगळती; मग पुणेकरांवर पाणीकपात कशासाठी? खर्चाचा हिशोब जाहीर करण्याचे अमोल बालवडकर यांची मागणी

पुणे : पुणे शहरात पाणीकपातीचा निर्णय घेतला जात असताना दुसरीकडे शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत तब्बल ३२ टक्के पाणीगळती होत असल्याची बाब समोर आली आहे. दररोज सुमारे ५२२ दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचा दावा करत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सत्ताधारी पक्ष भाजप आणि महापालिका प्रशासनाच्या पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २४x७ पाणीपुरवठा योजनेवर सुमारे १,६०० कोटी रुपये खर्च करूनही पाणीगळती कायम असेल, तर या योजनेचा पुणेकरांना नेमका काय फायदा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

बालवडकर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये पाणीगळती ३५ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचा महापालिकेने दावा केला होता. मात्र, २०२६ मध्येही सुमारे ३२ टक्के पाणीगळती कायम असल्याचे अहवालातून समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या गळतीमुळे दररोज अंदाजे ५२२ दशलक्ष लिटर, तर वर्षाला सुमारे ६ ते ७ टीएमसी पाणी वाया जात असल्याचा सांगितले आहे.

पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असत्या, तर पुणेकरांवर पाणीकपातीची वेळ आली असती का? २४x७ पाणीपुरवठा योजनेचे नियोजन, अंमलबजावणी आणि खर्चाची जबाबदारी नेमकी कोणाची, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे. यासाठी शहरातील पाणीगळतीचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करणे, १,६०० कोटींच्या योजनेचा सविस्तर आर्थिक लेखाजोखा जाहीर करणे, प्रभागनिहाय पाणीगळतीचा अहवाल प्रसिद्ध करणे, गळती रोखण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करणे तसेच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“पाणी वाया जाण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची; मग पाणीकपातीची झळ मात्र पुणेकरांनी का सहन करायची? पुणेकरांना पाणीकपात नको, तर पाणीगळतीमुक्त आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा हवा,” अशी भूमिका अमोल बालवडकर यांनी मांडली आहे.

See also  नुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ, कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कार