पुणे : राष्ट्रीय महामार्ग-४८ वरील बाणेर मधील बिटवाईज कॅम्पस, मर्सिडीज-बेंझ आणि सुमनकीर्ती शोरूम परिसरातील वाढती वाहतूककोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीने उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ना. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की, बिटवाईज कॅम्पस, मर्सिडीज-बेंझ आणि सुमनकीर्ती शोरूम परिसर हा सध्या पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूककोंडीचा बिंदू ठरला आहे. येथे असलेले विद्यमान लहान अंडरपास क्षमतेपेक्षा अधिक वापरले जात असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठीही गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नर्हे ते रावेत हा राष्ट्रीय महामार्ग पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आर्थिक दुवा आहे. आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्रे आणि नव्याने विकसित झालेल्या टाउनशिपमुळे या मार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरुवातीला बायपास म्हणून विकसित करण्यात आलेला हा मार्ग आता स्थानिक वाहतुकीचाही प्रमुख मार्ग बनला असून, सध्याचा सहा पदरी रस्ता आणि सर्व्हिस रोड वाढत्या वाहतुकीचा ताण पेलण्यासाठी अपुरे ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची स्थानिक नागरिक, उद्योग क्षेत्र आणि व्यावसायिकांकडून सातत्याने मागणी होत असल्याचे ना. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच, या प्रकल्पाला प्राधान्याने मंजुरी देऊन आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मान्यता द्यावी, अशी विनंती ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून, या उड्डाणपुलामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.















