पुलंच्या साहित्यविश्वाची अविस्मरणीय सफर : ‘पुलं’कितरंगाच्या २५ व्या प्रयोगाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रस्ता, पुणे येथे क्रिएशन थिएटर्स प्रस्तुत ‘पुलं’कितरंग या रंगमंचीय आविष्काराचा २५ वा प्रयोग मोठ्या उत्साहात आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाने उपस्थितांना पुलंच्या साहित्यविश्वाची अविस्मरणीय सफर घडवून आणली.

कथावाचन आणि कथाकथन यांचा सुरेख संगम असलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ लेखिका संगीता बर्वे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी धनकवडी शाखेच्या प्रमुख सुलभादिदी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

ज्येष्ठ अभिनेते व भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे माजी प्राचार्य प्रा. राजेंद्र उत्तुरकर यांनी पु. ल. देशपांडे यांचे गाजलेले ‘बिगरी ते मॅट्रिक’ हे लेखन आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने सभागृहात हास्याची कारंजी उडाली आणि पुलंच्या साहित्याचा जिवंत अनुभव रसिकांना मिळाला. कार्यक्रमात प्रियंका गोगटे यांनी ‘चितळे मास्तर’ ही पुलंची अजरामर व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.

निवेदिका सरिता अनिरुद्ध यांनी ओघवत्या आणि आकर्षक निवेदनातून कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली. संपूर्ण सभागृहात आनंद, उत्साह आणि साहित्यप्रेमाचे वातावरण अनुभवायला मिळाले. उपस्थित रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेत कलाकारांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.

आयोजकांचे नियोजन, कलाकारांची तन्मयता आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे ‘पुलं’कितरंगाचा २५ वा प्रयोग संस्मरणीय ठरला. पुलंच्या साहित्य, विनोद आणि जीवनदृष्टीला वाहिलेली ही अनोखी आदरांजली उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेली.

See also  पुणे महानगरपालिका आयुक्तांचा शेवाळवाडी–मांजरी दौरा : कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी बदलीची कारवाई