पुणे : कोथरूड येथील हनुमान नगर, सर्वे क्रमांक ४४/१/१/१ परिसरातील एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पाबाबत अनेक नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्यात सुमारे १० एकर जागेचा समावेश असल्याचे सांगितले जात असून, नागरिकांचे पुनर्वसन नेमके कोणत्या इमारतीत आणि कोणत्या ठिकाणी केले जाणार, याबाबत रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पात समाविष्ट करू नका’, अशी ठाम भूमिका हनुमान नगरमधील नागरिकांनी घेतली आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत महिलांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली. प्रकल्पाची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात यावी, पुनर्वसनाबाबत स्पष्टता असावी आणि रहिवाशांच्या संमतीचा विचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हनुमान नगर महिला मंडळ आणि मोलकरीण संघटना, हनुमान नगर यांच्या वतीने या प्रकरणी वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात दाद मागण्याचा ठराव मांडण्यात आला. नागरिकांना विश्वासात न घेता प्रकल्पात समाविष्ट केले जात असल्याची त्यांची भावना असून, आपल्या हक्कांसाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची तयारी महिलांनी दर्शवली.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल वांजळे, हनुमान नगर महिला मंडळाच्या सुलोचना खरसडे, उषा मांगवाना, रंजना लंघे, पुष्पा शिंदे, चित्रा सोनटक्के, राणी बोराडे, संगीता महाबरे, सुनंदा कोलांबडे, कांचन जाधव, राणीताई यादव, कुंदा हळंदे, भालेकर मावशी, मेरगळ वहिनी यांच्यासह सुमारे १०० ते १५० महिला उपस्थित होत्या.
प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या नयना शिवाजी सोनार यांनी महिलांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. हनुमान नगरमधील नागरिकांना एसआरए प्रकल्पाची अधिकृत माहिती मिळावी, पुनर्वसनाबाबत स्पष्टता यावी आणि रहिवाशांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, या मागण्यांसाठी पुढील काळात पाठपुरावा करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
















