वामा वुमन्स क्लबतर्फे ‘वामा स्त्रीशक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात संपन्न; महिला डॉक्टरांच्या कार्याचा गौरव; कॅन्सर जनजागृतीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बाणेर : महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी वामा वुमन्स क्लबच्या वतीने ‘वामा स्त्रीशक्ती सन्मान’ सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात एमओसी कॅन्सर रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित महिला डॉक्टरांना दैनंदिन वैद्यकीय सेवेदरम्यान कॅन्सरचे रुग्ण लवकर कसे ओळखावेत, कॅन्सरची प्राथमिक लक्षणे कोणती तसेच रुग्णांना योग्य वेळी तपासणी व उपचारासाठी कसे मार्गदर्शन करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावर्षीचा ‘वामा स्त्रीशक्ती सन्मान’ वैयक्तिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महिला डॉक्टरांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा दिलीप बोरसे, ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या डॉ. चित्रलेखा जाधव, डॉ. ऋतू लोखंडे आणि डॉ. तेजस्विनी समीर भाले यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून आयोजित विविध आरोग्य शिबिरांमध्ये सातत्याने सहभाग आणि सहकार्य करणाऱ्या डॉ. माया गोलीकरे आणि डॉ. पल्लवी रावत यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांनी सांगितले की, महिला डॉक्टरांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजातील गरजू महिलांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणे हा ‘वामा स्त्रीशक्ती सन्मान’ उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे लवकर निदान होण्यासाठी आजचे तज्ज्ञ मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल. भविष्यातही आरोग्य शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऋतुजा गुप्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्ता माडोळे यांनी विशेष सहकार्य केले.

See also  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे-मनवेश सिंग सिद्धू