पुणे – बाणेर : पुणे शहरातील प्राइम लोकेशन असलेल्या मौजे बाणेर येथील सर्व्हे नंबर ३३/२पै/१ मधील वडिलोपार्जित जमिनीत महसूल विभागाने मोठा घोळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळ ७/१२ वरील एकूण क्षेत्र २००६ सालीच संपुष्टात आले असताना देखील २०१३, २०१५ आणि २०१७ सालच्या खरेदी दस्तांआधारे २०२४-२५ मध्ये बोगस फेरफार नोंदी केल्या जात आहेत, असा गंभीर आरोप जमीन मालक श्री. आशिष ज्ञानेश्वर कळमकर यांनी केला आहे.
या प्रकरणी त्यांनी तहसीलदार हवेली, जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमांना पाठीशी घालून प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप केला आहे.
नेमका घोळ काय आहे? १. क्षेत्रापेक्षा जास्त विक्री: सर्व्हे नं. ३३/२पै/१ च्या ७/१२ उताऱ्यावरील मूळ क्षेत्र २ हे. १२ आर आहे. मात्र या क्षेत्रावर २ हे. ७४.४ आर म्हणजेच ६२.४ आर जास्त क्षेत्राची विक्री दाखवण्यात आली आहे. २००६ पर्यंतच २ हे. १७ आर क्षेत्राची विक्री झाली असून त्यानंतर ७/१२ वर शिल्लक क्षेत्र नसताना खाडाखोड करून अस्तित्वात नसलेल्या जमिनीचे दस्त नोंदवले जात आहेत.
२. २७.०९ आर क्षेत्र गायब: या सर्व्हे नंबरमधील फेरफार क्र. ६३२२ – श्री. प्रशांत विठ्ठलराव देशपांडे (७.४४ आर), फेरफार क्र. ११३४८ – सौ. अरुणा विटकर व श्री. प्रमोद विटकर (४.६५ आर), फेरफार क्र. ७९५१ – श्री. राजेश वासवाणी व लाज अहुजा (१५ आर) असे एकूण २७.०९ आर क्षेत्र हस्तलिखित ७/१२ वर दिसत असताना संगणकीकृत ७/१२ वरून कोणत्याही कायदेशीर आदेशाशिवाय कमी करण्यात आले आहे. याबाबत मंडल अधिकारी कोथरूड (दि. ०५/०५/२०२५) आणि ग्राम महसूल अधिकारी बाणेर (दि. २१/०५/२०२५) यांनी अहवालही दिला आहे की सदर नोंदी पुन्हा ७/१२ वर घेणे आवश्यक आहे.
३. खाजगी रस्त्याचा घोळ: या मिळकतीमध्ये मयत रघुनाथ महादेव कळमकर यांच्या मालकीचा ३४,००० चौ.फू. (३१५९.८५ चौ.मी. / ३१.५९ आर) खाजगी वहिवाटीचा रस्ता आहे. हा रस्ता केवळ वहिवाटीसाठी म्हणून २३/११/२००६ रोजी दस्त क्र. ९१५६/२००६ अन्वये गेरा डेव्हलपर्स यांना करारनामा लिहून दिला असून त्याचा ७/१२ पान नं. ८ व ९ आणि नकाशा पान नं. १० वर उल्लेख आहे. मालकी हक्क अबाधित ठेवून फक्त वापराचा हक्क दिला असताना त्यालाही खरेदी दाखवले जात आहे.
४. रद्द झालेला मोजणी नकाशा: फेरफार क्र. २१३४६ (दस्त ८४११/२०१७ – २३.१० आर) मध्ये जोडलेला सदोष मोजणी नकाशा मो.र.नं. २२०३५/२०१७ हा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी अपील क्र. ४१६८/२०१८ मध्ये दि. ३१/०७/२०१९ रोजीच रद्द केला आहे. “धारण क्षेत्रापेक्षा जास्त विक्री आणि नोंदीची बेरीज जास्त येते” असे स्पष्ट आदेशात असतानाही महसूल विभागाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही.
५. चुकीची माहिती विधानसभेत: विधानसभा तारांकित प्रश्न क्र. १४१४६७ मध्ये तहसीलदार हवेली यांनी “७/१२ वर खाडाखोड झालेली नाही, अतिरिक्त क्षेत्राची नोंद झाली नाही” अशी चुकीची टिपणी दिल्याचा आरोप आहे.
२२ फेरफारांच्या पुनर्रिक्षणाची मागणी : अर्जदाराने दिलेल्या तक्रारीनुसार मौजे बाणेर सर्व्हे नं. ३३/२पै/१ मधील फेरफार क्रमांक १७६६०, १७९५६, १७२२६, १५९३३, १५९३४, १८४९७, २२१५८, १५९३५, २४१०४, १५९३६, १६३२९, १६८५४, २०७६३, १६९७६, १७४९९, १९९९९, १९९९०, २०२९७, २०२९८, २०५९०, २५२५८, २१३४६ आणि २४७७६ या २२ फेरफारांचे पुनर्रिक्षण करणे आवश्यक आहे, असे ग्राम महसूल अधिकारी बाणेर यांनीच आपल्या अहवालात नमूद केले आहे.
विशेष म्हणजे फेरफार क्र. २५२५८ (२०१३ व २०१५ च्या दस्तावर २०२५ साली नोंद), २१३४६ (२०१७ च्या खरेदीवर) आणि २४७७६ (२०१७ च्या वारस नोंदीवर) या तिन्ही फेरफार नोंदी क्षेत्र शिल्लक नसताना झाल्याने त्या रद्द होणे आवश्यक असल्याचे महसूल अहवालात स्पष्ट म्हटले आहे.
ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणूनही या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच हेराफेरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी श्री. कळमकर यांनी केली आहे.















