गरीब रुग्णांना स्वस्त दरात औषधे मिळू नयेत, यासाठीचे षडयंत्र हाणून पाडा – उमेश चव्हाण

पुणे दि. 28- स्वस्त दरातील औषध विक्रीचे फलक दिसले तर त्यांच्या दुकानावर कारवाई करू, अशा पद्धतीचे परिपत्रक जाहीर करून सर्वसामान्य छोट्या औषध विक्रेत्या दुकानदारांना भीती दाखवून धमकी देण्याचे, दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न राज्याचे औषध विभागाचे सह आयुक्त भुषण पाटील करीत आहेत. राज्य सरकारमध्ये सर्वसामान्य रिक्षावाला मुख्यमंत्री असताना आणि राज्याला दोन-दोन उपमुख्यमंत्री असताना देखील या कर्तबगार मंत्र्यांचे अशा प्रकारांकडे लक्षच दिसत नाही, एकदा सत्ता मिळाली की गरीब रुग्ण मेले तरी चालतील. अशीच भूमिका देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे आहे का? गरीब रुग्णांना जर स्वस्त दरात औषधे मिळणार नसतील तर हे सरकारी पातळीवरचे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.


सर्वसामान्य गरीब रुग्णांना स्वस्त दरात औषधे मिळूच नयेत आणि गरीब औषध विक्रेता दुकानदार उध्वस्त झाला पाहिजे, यासाठी सरकारी पातळीवर सहआयुक्त भूषण पाटील काम करत असताना सरकारमधील संबंधित औषध खात्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम काय झोपा काढत आहेत का? असा संतप्त सवाल हजारो गरीब रुग्ण आणि लहान औषध विक्रेते व्यवसायिक विचारत आहेत. भूषण पाटील यांनी केलेले हे पापी षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
एकीकडे हजारो लाखो रुपयांनी औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत. नांदेड आणि ठाण्यात एकेका दिवसाला 25 लहान बालकांचे मृत्यूची हाय आरोग्य विभागाला लागलीय. पुण्यातील ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. ससून सारखे हॉस्पिटल आता सर्वसामान्य रुग्णांचे नाही तर ललित पाटील सारख्या ड्रग्ज माफीयाचे आहे, अशीच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची अब्रूची लक्तरे निघालेली असताना अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अखत्यारीतील औषध विभागाचे सह.आयुक्त भूषण पाटील गोरगरिबांच्या मुळावर उठलेले दिसतात. गोरगरिबांना स्वस्त दरात औषधे मिळूच नयेत, यासाठी त्यांनी सरकारी आदेश असलेले परिपत्रक जाहीर केले आहे. यामुळे समस्त गरीब रुग्णांमध्ये व छोट्या औषध विक्रेत्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड मोठी संतापाची लाट उसळलेली दिसते.

See also  राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता


सरकारने गरिबांसाठी काम करायचे असते आणि त्यांना दिलासा द्यायचा असतो. मात्र आताचे सरकार गरिबांना दिलासा मिळू नये व त्यांना मोठा त्रास व्हावा, या पद्धतीचे काम करताना दिसते. म्हणूनच भूषण पाटील सारख्या औषध विभागाच्या सहआयुक्ताचे “स्वस्त दरात औषधे विक्रीचे बोर्ड लावाल तर कारवाई करू!” असे म्हणण्याचे धाडस होत आहे.
औषध विक्रेत्या छोट्या व्यावसायिकांना – लहान दुकानदारांना संपविण्यासाठी औषध विभागाचे सह आयुक्त भूषण पाटील यांनी किती खोक्यांची सुपारी घेतली? किती पैसे खाल्ले? याविषयीचे प्रश्न आता लोक विचारत आहेत. गरीब रुग्णांना जर स्वस्त दरात दर्जेदार औषधे मिळणार नसतील तर येथील औषध विक्रेते छोटे व्यावसायिक आणि गरीब रुग्ण भूषण पाटीलच्या तोंडाला काळे फासतील. राज्याचे औषध विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम वेळीच सह आयुक्त भूषण पाटीलला निलंबित करा, नाहीतर तुम्हाला देखील राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा देखील रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला.