बारामतीच्या धर्तीवर पौड बसस्थानकाचा कायापालट करा; भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन ‘फ्युचर रेडी’ आराखडा तयार करण्याची मागणी

पुणे : मुळशी तालुक्यातील वाढते शहरीकरण, पर्यटन, औद्योगिक विकास आणि पुणे-कोलाड महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता पौड येथील बसस्थानकाचे बारामती बसस्थानकाच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छत्रपती शिवाजीनगर/कोथरूड शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांनी केली आहे.

पौड हे मुळशी तालुक्याचे प्रमुख केंद्र असून पुणे-कोलाड महामार्ग पौडमधून जातो. पुढे हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला जोडला जात असल्याने कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची तसेच पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पौड बसस्थानक हे महत्त्वाचे वाहतूक केंद्र ठरण्याची शक्यता असून, पुढील दहा वर्षांतील वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि वाहतुकीचा विचार करून आतापासूनच बसस्थानकाचा विकास करणे आवश्यक असल्याचे निम्हण यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यकाळात बारामती बसस्थानकाचा आधुनिक आणि सर्वसुविधायुक्त पद्धतीने कायापालट करण्यात आला. त्याच धर्तीवर पौड बसस्थानकाचा विकास केल्यास मुळशी तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रस्तावित बसस्थानकात डिजिटल टाइम-टेबल डिस्प्ले, हायटेक सीसीटीव्ही यंत्रणा, पीएमपीएमएल व एसटी बसेससाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म, मोठा बसथांबा, चालक-वाहक व प्रवाशांसाठी विश्रामगृह, जलद बस पास केंद्र, प्रवाशांच्या तक्रारी व विविध सवलत योजनांसाठी केंद्रीय कार्यालय, २४ तास प्राथमिक उपचार केंद्र, मोफत शुद्ध पिण्याचे पाणी, सुसज्ज स्वच्छतागृह तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पौड बसस्थानकासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय जागेची एसटी महामंडळ, पीएमपीएमएल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ‘फ्युचर रेडी प्लॅन’ तयार करावा, अशी मागणीही निम्हण यांनी केली आहे.

पौड गाव हे मुळशी तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असून पौड येथे शासकीय निमशासकीय कार्यालय बँका इत्यादी आहे तसेच येथूनच पुणे कोलाड हायवे असून त्यामुळे पौड येथे हजारो लोकांची नेहमीच वर्दळ असते असे असताना सुद्धा कित्येक अनेक वर्षापासून  एसटी बस डेपो ची इमारत अशाच अवस्थेमध्ये पडून आहे तरी बारामतीच्या धर्तीवर पौड एसटी डेपोची अद्यावत अशी सुसज्ज इमारत हवी अशी स्थानिक नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे. मुळशीच्या वाढत्या विकासाचा वेग पाहता बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा निर्णय भविष्यात घेण्याऐवजी आत्ताच नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

See also  साखर देता का कोणी साखर?आता शिक्षकांवर साखर अंड्यासाठी पैसे जमा करण्याचे काम! ‘आता सरकारला लहान मुले सुद्धा नावडती झाली का?’: आप पालक युनियन