महाळुंगे : महाळुंगे परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात अकरा वर्षीय विराज संदीप पाटोळे याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनने यंदाची दहीहंडी २०२६ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विराजला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासोबतच त्याच्या स्मृतीला सामाजिक कार्यातून जिवंत ठेवण्याचा संकल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी केला आहे.
दहीहंडी उत्सवासाठी खर्च होणारा निधी प्रभाग क्रमांक ९ मधील खड्डे बुजविणे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शक्य ती मदत करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘उत्सवापेक्षा नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची’ या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.
या संदर्भात फाउंडेशनने प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या परिसरातील धोकादायक खड्डे किंवा खराब रस्त्यांची छायाचित्रे अथवा व्हिडिओ पाठवावेत. त्यासोबत संबंधित ठिकाणची अचूक Google Maps लोकेशनही WhatsApp वर पाठवावी. WhatsApp क्रमांक : ७७०९४२५०३४
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे धोकादायक आणि तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या ठिकाणांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर फाउंडेशनच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याबरोबरच संबंधित प्रशासनाकडेही या समस्यांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
“विराजचे जाणे आम्ही विसरू शकत नाही. एका निष्पाप मुलाचा जीव गेला आहे. या दुःखाची भरपाई कोणत्याही कामाने होऊ शकत नाही. मात्र, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या परीने काहीतरी योगदान देता येऊ शकते. संपूर्ण प्रभागातील प्रत्येक रस्ता दुरुस्त करणे शक्य नसले तरी जेवढे शक्य आहे तेवढे करण्याची आमची प्रामाणिक इच्छा आहे,” अशी भूमिका फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
“यंदाची दहीहंडी आमच्यासाठी केवळ उत्सव नसून विराजला श्रद्धांजली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला सामाजिक संकल्प आहे,” असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे ही केवळ गैरसोय नसून नागरिकांच्या जीवाशी संबंधित गंभीर बाब आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन धोकादायक रस्ते आणि खड्ड्यांवर तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अकरा वर्षीय विराज संदीप पाटोळे व 26 वर्षीय श्रीहरी याला याच माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
















