मानीव दिनांकापासूनच्या पदोन्नती प्रक्रियेत सर्व सेवकांना समान न्याय द्या; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन; आठ दिवसांत प्रक्रिया रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनांवरील प्रशासकीय सेवेमधील काही हुद्द्यांची मानीव दिनांकापासून पदोन्नती करण्याची प्रस्तावित प्रक्रिया रद्द करून सर्व संबंधित सेवकांची नव्याने सखोल तपासणी व पडताळणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १५) महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), उपआयुक्त, आस्थापना विभाग तसेच महापौर यांना निवेदन देण्यात आले.

पुणे महापालिकेच्या आस्थापनांवरील प्रशासकीय सेवेमधील काही हुद्द्यांची मानीव दिनांकापासून पदोन्नती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रस्तावित यादीमध्ये अनेक सेवकांचा समावेश करण्यात आलेला नसून, त्यामुळे उर्वरित सेवकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काही सेवकांना यापूर्वीही मानीव दिनांकाचा लाभ घेऊन पदोन्नती मिळालेली असताना, त्याच हुद्द्यावरील इतर सेवकांना अद्याप हा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करून सर्व सेवकांना समान न्याय व पदोन्नतीचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्व संबंधित सेवकांचा समावेश करण्याची मागणी
प्रस्तावित पदोन्नती प्रक्रियेमध्ये सध्या कार्यरत असणारे प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक तसेच प्रशासकीय सेवेमधील इतर सर्व संबंधित सेवकांचा समावेश करावा. सर्वांची मानीव दिनांकापासून नव्याने तपासणी व पडताळणी करून त्यानुसार पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. सध्या सुरू असलेली प्रस्तावित पदोन्नती प्रक्रिया रद्द करून सर्व संबंधित सेवकांची एकत्रितपणे नव्याने पदोन्नती प्रक्रिया राबवावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मानीव दिनांकापासून करण्यात येणारी पदोन्नतीची प्रस्तावित प्रक्रिया येत्या आठ दिवसांत रद्द न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुहास निम्हण यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

See also  आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे थकीत २४०० कोटी तातडीने द्यावेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी