श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण केले.भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी वारंवार पाठपुरवठा करुनही शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सुळे यांनी आंदोलन केले.

भर उन्हात सुप्रिया सुळे या आंदोलनाला बसल्या, ऊन तापत असताना अद्यापही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. सुप्रिया सुळे यांनी दि. ९ एप्रिल सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी, ‘आम्ही रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करतो आहोत पण याची दखल घेतली जात नाही, तारीख पे तारीख दिली जात आहे. पीएमआरडीएच्या आयुक्तांनी दिलेली डेडलाइन मागेच उलटून गेली. परंतु अद्यापही तेथे रस्त्याचे कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हा रस्ता भाविकांना ये-जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांना तसेच स्थानिकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. मात्र वारंवार मागणी करुनही प्रशासन जाग होत नाही. असा आरोप सुळेंनी यावेळी केला.

तसेच, जोपर्यंत बनेश्वर रस्त्याच्या विषयावर प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार असल्याचे सुळे म्हणाल्या. या देशात करोडो रुपये खर्च करून मेट्रो होते पण दीड किलोमीटरचा रस्ता होत नाही हे दुर्दैव आहे. गेले सहा महीने झाले आम्ही या रस्त्यासाठी पाठपुरावा करतो आहे. पण हे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी  यावेळी केला.

यावेळी आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

See also  बाबुरावजी घोलप महाविद्यालयात बॅरिस्टर जयकर व्याख्यानमाला संपन्न