औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

औंध : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी उत्सव उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या भव्य पथसंचलनाचे आणि स्वयंसेवकांच्या विविध प्रात्यक्षिकांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या कार्यक्रमाला १८२ स्वयंसेवक आणि २८५ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिस्तबद्ध पथसंचलन आणि नागरिकांकडून पुष्पवृष्टी
उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरलेल्या पथसंचलनाला वायरलेस कॉलनीतील दत्त मंदिर येथून प्रारंभ झाला. घोष पथकाच्या (बँड) तालावर आणि शिस्तबद्ध पाऊल टाकत निघालेले हे संचलन वेस्टएंड मॉल, आंबेडकर चौक आणि सिल्व्हन हाइट्स सोसायटी मार्गे पुढे सरकले. या संचलनाचा समारोप सानेवाडी मैदान, औंध येथे झाला. संचलनाच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी आणि महिलांनी रांगोळ्या काढून व  पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

सानेवाडी मैदानावर विजयादशमीच्या परंपरेनुसार विधीवत शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर स्वयंसेवकांनी शारीरिक क्षमतेची आणि शिस्तीची दर्शन घडवणारी विविध प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये पदविन्यास, घोष (बँड), योग आणि दंडाची (लाठी) कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

श्री. ऋषी बाळ कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि ‘BharatGen’ या भारताच्या सार्वभौम AI उपक्रमाचे प्रमुख श्री. ऋषी बाळ (AI क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ, माजी गुगल व मायक्रोसॉफ्ट संशोधक) यांनी आपल्या बौद्धिक मार्गदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “भारताचा इतिहास आणि संस्कृती याविषयी पाश्चात्त्य दृष्टिकोनातून जो पक्षपात आणि चुकीची माहिती पसरवली जाते, ती दूर करण्यासाठी आपल्याला स्वदेशी AI तंत्रज्ञान विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे.”

AI चा वापर केवळ माहिती मिळवण्यापुरता मर्यादित न ठेवता अवघड विषय सोपे करणे, अभ्यासात मार्गदर्शक म्हणून वापरणे आणि आव्हानात्मक कामे पूर्ण करण्यासाठी तरुणांनी याचा योग्य वापर करावा, असे सांगत त्यांनी संगणकाप्रमाणेच AI चा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

श्री. जयदीप धर्माधिकारी शस्त्रपूजन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर सहकार्यवाह श्री. जयदीप अनंत धर्माधिकारी (आयटी कंपनीतील उच्चपदस्थ अभियंता व माजी संघ प्रचारक) यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने संघकार्यात जोडले जाणे कसे सुलभ झाले आहे, यावर विचार मांडले. युरोपमधील सध्याची आंदोलने आणि सामाजिक प्रश्नांचा दाखला देत त्यांनी भारताने यातून धडे घेण्याची गरज व्यक्त केली.

तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून काही वेळ संघकार्यासाठी आणि समाजासाठी दिला पाहिजे. तसेच त्यांनी ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेवर भर देत सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा आग्रह आणि नागरिक कर्तव्ये या पाच मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करण्याचे आवाहन केले.

See also  सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आक्रमक : आरएमसी प्लांट त्वरीत बंद करा: 'कृती समिती'चा आंदोलनाचा इशारा

व्यासपीठावरील मान्यवर आणि हिंदू समाजाचा सहभाग
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विद्यापीठ भाग संघचालक श्री. सुभाष लक्ष्मणराव कदम आणि औंध नगर संघचालक श्री. सुनील गुंडोपंत मुतालिक प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी अतिथींचा परिचय करून दिला. हा विजयादशमी उत्सव यशस्वी करण्यासाठी औंध नगरातील सकल हिंदू समाजाचा उत्स्फूर्त सहभाग, पाठिंबा आणि मोलाचे सहकार्य लाभले. एकात्मता आणि शिस्तीचा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली.