नसरापूरमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणाऱ्या बालकलाकारांचा गौरव

नसरापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश बालमनावर रुजविण्यासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या इको-फ्रेंडली श्रीगणेश मूर्ती स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव समारंभ नसरापूर येथे उत्साहात पार पडला.

श्रीभगवती सेवा आश्रम आणि जीवन कौशल्य विकास यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रकाश शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी हरी कार्येकर प्राथमिक शाळा आणि विजय मुकुंद आठवले माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विधिज्ञ विजयकुमार मालू, डॉ. श्याम कुलकर्णी आणि अशोक राव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

प्राथमिक शाळेतील विजेत्यांमध्ये प्रणील योगेश राऊत, अनुष्का कुलदीप पाचकाळे आणि स्वराली सुरेश कुंभार यांचा समावेश आहे. माध्यमिक शाळेतून सिद्धेश मांढरे, श्रावणी शिळीमकर आणि आरोही खुटवड यांनी यश संपादन केले. याशिवाय दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांनाही पदके देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

या वेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मांढरे मॅडम आणि माध्यमिक शाळेच्या कांबळे मॅडम उपस्थित होत्या. ज्ञान प्रकाश शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. शाम दलाल, डॉ. पुष्कर दलाल आणि कार्यक्रमाचे संयोजक गिरीधर राठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.

गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव न राहता पर्यावरण संवर्धन आणि भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्याचे माध्यम ठरावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

See also  संकटातून संकल्पाकडे नेणार्यांचा सन्मान सोहळा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांच्या हस्ते संपन्न