पुणे : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते जंगली महाराज रस्ता परिसरातील छत्रपती संभाजीराजे उद्यानात बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पुणेकरांना वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
पुणे शहरातील वाढते तापमान, वायुप्रदूषण आणि ढासळता पर्यावरणीय समतोल याबाबत जॅकी श्रॉफ यांनी चिंता व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, तर लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. अपरिहार्य कारणांमुळे वृक्षतोड करावी लागल्यास त्याबदल्यात जास्तीत जास्त नवीन वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. भावी पिढीचे, विशेषतः लहान मुलांचे भविष्य सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सहमहापालिका आयुक्त तथा उद्यान विभागप्रमुख डॉ. अशोक घोरपडे, उपायुक्त माधव जगताप यांच्यासह उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पुणे शहराच्या निर्मितीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
















