पिंपरी : शिरगाव, तालुका मावळ येथील श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व संलग्न श्री साईबाबा अन्नछत्र मंडळ यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सध्याचे विश्वस्त रवी जाधव व उमेश कविटकर आणि त्यांचे साथीदार यांनी पोलीस प्रशासन मधील काही अधिकारी व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगणमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार, दानपेटीतील देणगी रकमेची अफरातफर, बनावट ठराव व दस्त ऐवजांमध्ये फेरफार तसेच आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप ट्रस्टचे संस्थापक व तहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख यांनी केला आहे.
गुरुवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे संस्थापक व तहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख, तहयात विश्वस्त समीर शेख, ॲड. अनघा कुलकर्णी, अक्षय धावरे, रामभाऊ गोपाळे व शिरगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
तहयात विश्वस्त समीर शेख यांनी यावेळी सांगितले की, हा सार्वजनिक न्यास नोंदणीकृत असून त्याची नोंदणी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय पुणे येथे दि. ९ सप्टेंबर २००२ रोजी करण्यात आली असून त्याचा नोंदणी क्रमांक इ/३६७४/पुणे असा आहे. यामध्ये एकूण ७ विश्वस्त असून यापैकी अध्यक्ष तत्कालीन आमदार प्रकाश देवळे हे होते. त्यावेळी देवळे यांच्या समवेत प्रसाद दत्तात्रय पाटील, प्रमोद माणिक शेठ दुगड, धोंडीराम बाबा चव्हाण, उस्मान दगडू शेठ आणि दिगंबर शेठ बाळासाहेब भेगडे, प्रा. नारायण सदाशिव फरांदे हे विश्वस्त होते. प्रकाश देवळे यांचे २४ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक रवी जाधव व उमेश कविटकर यांचे विश्वस्त म्हणून नाव लावण्यात आले. यानंतर रवी जाधव व उमेश कविटकर यांनी अनेक वेळा सध्याचे विश्वस्तांना विश्वासात न घेता बेकायदेशीर आर्थिक अफरातफर केली आहे असा आरोप केला. यामुळे या श्री साई मंदिरात भेट देण्यास येणाऱ्या साई भक्तांच्या भावनांचा अनादर झाला आहे. या ठिकाणी पुणे मुंबईतील मोठ्या शहरासह देश परदेशातून साईभक्त नवस बोलण्यासाठी व संकल्प सोडण्यासाठी येतात आणि श्रद्धेने येथे दान करतात यामध्ये सोने, चांदी, हिरे आधी मौल्यवान दागिन्यांसह रोख रकमेचा देखील समावेश असतो. यामध्ये लाखो रुपयांची दरमहा रक्कम जमा होते. यातील ठराविकच रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा केली जाते व उर्वरित रक्कम त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बेकायदेशीररित्या वापरली जात असल्याचा संशय आहे. संबंधितांनी अनेक वेळा बेकायदेशीरपणे दानपेटी फोडून यातील रोख रकमेचा अपहार केला आहे. बँकेत भरलेल्या रकमेचा देखील नोटांचा तपशील जुळत नाही. याविषयी आम्ही तक्रार केली असता त्यांनी दानपेटी नोटांच्या तपशिलाचे बोगस पेपर्स तयार केले हे देखील एकाच दिवशी एकाच व्यक्तीच्या अक्षरातील असल्याचा आरोप आहे याची देखील तपासणी व्हावी. तसेच संस्थेला या परिसरात दुकानदारांकडून मिळणारे भाडे याचा देखील तपशील जुळत नाही. याविषयी अनेक वेळा स्थानिक पोलीस प्रशासनांकडे तसेच धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात लेखी तक्रार आम्ही विश्वस्त व ग्रामस्थांनी केली आहे. मात्र आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील काही अधिकारी रवी जाधव व उमेश कविटकर यांच्या समवेत या भ्रष्टाचारात सामील झाले असल्याचा संशय समीर शेख यांनी व्यक्त केला.
तसेच या मंदिरात जमणाऱ्या निधीचा उपयोग स्थानिक गावाच्या विकास कामासाठी केला जावा अशी देखील मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली आहे. येथील अन्नछत्रातील दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पवित्र नदीत सोडून दिले जाते त्यामुळे नदी प्रदूषण व परिसरात पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. याविषयी भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करावी अन्यथा १५ डिसेंबर २०२६ पासून माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर आम्ही उर्वरित विश्वस्त तसेच शिरगावचे ग्रामस्थ आंदोलन व उपोषण करू असा इशारा या पत्रकार परिषदेत समीर शेख यांनी दिला.
















